वाघाच्या गळ्यात अडकला शिकारीचा फास; टिपेश्वर अभयारण्यातील प्रकार

By ऑनलाइन लोकमत | Published: February 2, 2024 10:47 PM2024-02-02T22:47:52+5:302024-02-02T22:48:08+5:30

शिकारी सक्रिय असल्याचा संशय

A hunter's noose stuck around the tiger's neck; Type from Tipeshwar Sanctuary | वाघाच्या गळ्यात अडकला शिकारीचा फास; टिपेश्वर अभयारण्यातील प्रकार

वाघाच्या गळ्यात अडकला शिकारीचा फास; टिपेश्वर अभयारण्यातील प्रकार

संतोष कुंडकर

वणी (यवतमाळ) : केळापूर तालुक्यातील टिपेश्वर अभयारण्यात गळ्याला फासाचा तार अडकलेला वाघ फिरत आहे. ही बाब पर्यटकांच्या निदर्शनास आल्यानंतर अभयारण्यात शिकारी सक्रिय असल्याची बाब पुन्हा समोर आली आहे. काही दिवसांपूर्वी एका वाघिणीसोबतही असा प्रकार घडला होता. अभयारण्यात रानडुक्कर, रोही, सांबर, चितळ, नीलगाय, ससे, मोर यांची संख्याही मोठी आहे. या प्राण्यांच्या शिकारीसाठी लावण्यात आलेल्या फासात वाघ अडकला असावा, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

पांढरकवडा तालुक्यातील टिपेश्वर अभयारण्य व्याघ्र दर्शनासाठी प्रसिद्ध आहे. येथे पर्यटकांचा राबता मोठा आहे. प्रसारमाध्यमांवरील रील्स, तसेच वाघांच्या मनमोहक अदांच्या फोटोमुळे पर्यटक या अभयारण्याकडे आकर्षित होत आहेत. वाघांची, बछड्यांची भ्रमंती, शिकार इत्यादी अनुभव सफारीदरम्यान पर्यटक घेतात. अशातच अभयारण्यातील कक्ष क्रमांक १११ मध्ये एका पर्यटकास शिकारीच्या दृष्टीने लावण्यात आलेल्या फासाची तार वाघाच्या गळ्यात अडकून असल्याचे दिसून आले. दरम्यान, अभयारण्यात प्लास्टिक कचरा टाकण्यास सक्त मनाई आहे आणि दंडात्मक कार्यवाहीचीसुद्धा तजवीज आहे; परंतु तरीही काही पर्यटक निष्काळजीपणे प्लास्टिक कचरा, तसेच प्लास्टिकच्या पाणी बॉटल अभयारण्य परिसरात फेकतात. काही दिवसांपूर्वी एक वाघ अशाच रिकाम्या पाणी बॉटलसोबत खेळतानाचे फोटो आणि व्हिडीओ व्हायरल झाले होते. त्यानंतर आता वाघाच्या गळ्यात हा फास गळ्यात अडकल्याचे पुढे आले आहे.

वाघ अनेकदा टिपेश्वरच्या बाहेर जातात. एखाद्या शेतात लावलेला फास त्या वाघाच्या गळ्यात अडकला असावा. या वाघाला बेशुद्ध करून त्याच्या गळ्यातील फास काढण्याची परवानगी वरिष्ठांनी दिली आहे. शनिवारी वाघाच्या गळ्यातील फास काढण्याचे प्रयत्न केले जाणार आहेत.
-उत्तम फड, विभागीय वनअधिकारी, वन्यजीव विभाग, पांढरकवडा

Web Title: A hunter's noose stuck around the tiger's neck; Type from Tipeshwar Sanctuary

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.