वणीलगत वाघाच्या हल्ल्यात मजूर गंभीर जखमी, पहाटे ४ वाजता घडली घटना
By ऑनलाइन लोकमत | Published: November 24, 2022 07:32 AM2022-11-24T07:32:56+5:302022-11-24T07:33:44+5:30
Yavatmal: पहाटे ४ वाजता शौचास जात असलेल्या मजुरावर दबा धरून बसलेल्या वाघाने हल्ला करून त्याला गंभीर जखमी केल्याची घटना गुरूवारी घडली. जखमीला वणीतील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
- संतोष कुंडकर
वणी(यवतमाळ): पहाटे ४ वाजता शौचास जात असलेल्या मजुरावर दबा धरून बसलेल्या वाघाने हल्ला करून त्याला गंभीर जखमी केल्याची घटना गुरूवारी घडली. जखमीला वणीतील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. उमेश पासवान (३५) असे जखमीचे नाव असून तो बिहार राज्यातील रहिवासी आहे.
वणीलगतच्या ब्राह्मणी गावालगतच्या परिसरात वीज टाॅवर उभारणीचे काम सुरू आहे. या ठिकाणी मजूर म्हणून तो काम करतो. गुरूवारी पहाटे ४ वाजता उमेश मजुरांच्या राहुटीपासून काही अंतरावर शौचाससाठी गेला होता. याच ठिकाणी वाघ दबा धरून बसला होता. काही कळायच्या आत वाघाने उमेशवर हल्ला केला. त्यामुळे घाबरून गेलेल्या उमेशने जीवाच्या आकांताने आरडाओरड केली. उमेशचा आवाज ऐकून राहुटीवर असलेल्या इतर मजुरांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. या मजुरांनी आरडाओरड केल्याने वाघाने तेथून माघारी फिरला. मजुरांनी उमेशला तातडीने वणीतील एका खासगी रूग्णालयात उपचारासाठी दाखल केले. उमेशच्या मानेवर व गळ्यावर गंभीर दुखापत झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून वणी शहराच्या अवतीभोवती वाघाचा मुक्तसंचार सुरू आहे. यापूर्वी वणी तालुक्यातील रांगणा-भुरकी शिवारात वाघाने एका २२ वर्षीय तरूणाला ठार केले होते. त्यानंतर वणी शहरातील मनिषनगरमध्येसुद्धा वाघ शिरला होता. सातत्याने घडणाऱ्या या घटनांमुळे नागरिक दहशतीखाली आहेत.