अल्पवयीन मुलीला फरफटत नेऊन शेतात केला अत्याचार; एकाने ठेवली पाळत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 21, 2022 09:20 PM2022-03-21T21:20:32+5:302022-03-21T21:22:07+5:30
Yawatmal News अल्पवयीन मुलीला शेतात नेऊन तिच्यावर दोघांनी अत्याचार केल्याची घटना यवतमाळ जिल्ह्यातील मारेगाव येथे घडली.
यवतमाळ : १७ वर्षीय अल्पवयीन मुलगी दुपारी सव्वाबारा वाजेच्या सुमारास गावाबाहेर शौचास जात असताना दोन तरुणांनी मोटारसायकलवर येत मुलीला जबरदस्तीने दुचाकीवर बसविले. त्यानंतर जवळच्या शेतात नेऊन त्यापैकी एकाने तिच्यावर अत्याचार केला, तर दुसऱ्याने ये-जा करणाऱ्यांवर पाळत ठेवली. सोमवारी तालुक्यातील कुंभा शेतशिवारात घडलेल्या या घटनेने पंचक्रोशीत खळबळ उडाली असून, समाजमन सुन्न झाले आहे. दरम्यान, मारेगाव पोलिसांनी सायबर सेलची मदत घेत दोघाही आरोपींना राळेगाव येथून अटक केली. शहबाज शेख शब्बीर (२७, रा. मातानगर, राळेगाव) व हर्षल लाला मडावी (१८) अशी आरोपींची नावे आहेत. घटनेनंतर पीडितेने आपल्या पालकांसह मारेगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी आरोपीविरुद्ध अत्याचाराचे गुन्हे दाखल केले आहेत.
कुंभा येथील एक १७ वर्षीय मुलगी सोमवारी दुपारी १२.१५ वाजेच्या सुमारास शौचास जाण्यासाठी म्हणून घराबाहेर पडली. गावालगतच्या शिवाराकडे ती मोबाइलवर बोलत निघाली. याचवेळी अचानक मागाहून दोन युवक आले. काही कळायच्या आत त्या दोघांनी जबरीने तिला मोटारसायकलवर बसवून शेतशिवारात नेले. तेथे दुचाकीवरून उतरवून नंतर तिला फरफटतच राजू केळकर यांच्या शेतातील झुडपात नेले.
यावेळी पीडितेने बचावासाठी आरडाओरड केली. मात्र आजूबाजूला कुणीही नसल्याने तिला मदत मिळाली नाही. दोघांपैकी एकाने तिला मारहाण करीत तिच्यावर अत्याचार केला. यावेळी त्याचा सहकारी घटनास्थळाकडे कुणी येत नाही ना, यासाठी पाळत ठेवून होता. दरम्यान, अत्याचारानंतर त्या दोनही आरोपींनी दुचाकीद्वारे तेथून पळ काढला. त्यानंतर पीडितेने तिच्यावर घडलेला प्रसंग आईपुढे कथन केला. आईने लगेच तिला सोबत घेऊन मारेगाव पोलीस ठाणे गाठले.
पोलिसांच्या तत्परतेने आरोपींना राळेगावातून अटक
अत्याचाराच्या या घटनेची तक्रार प्राप्त होताच, सहायक पोलीस निरीक्षक राजेश पुरी यांनी आरोपींच्या अटकेसाठी हालचाली सुरू केल्या. यवतमाळच्या सायबर सेलची मदत घेत संबंधित मोबाइल क्रमांकाचे लोकेशन शोधून काढले. त्यानंतर ते लोकेशन राळेगाव पोलिसांना देण्यात आले. मारेगावचे सहायक पोलीस निरीक्षक मुडे यांच्या मदतीने अत्याचार प्रकरणातील दोन्ही आरोपींच्या मुसक्या अवघ्या काही तासात आवळण्यात आल्या.