हवेच्या वेगाने धावल्या बैलजोडी; सहा सेकंद २१ पाॅइंटमध्ये अंतर सर, जिंकले लाखाचे बक्षीस
By ऑनलाइन लोकमत | Published: February 24, 2023 03:52 PM2023-02-24T15:52:40+5:302023-02-24T15:59:20+5:30
शंकरपट पाहण्यासाठी वाघापूर बायपासवर उसळली गर्दी; धावपट्टीवरचा जोश साऱ्यांनीच अनुभवला
यवतमाळ : विविध रंगी, देखण्या आणि चपळ बैलजोड्या हवेच्या वेगाने निर्धारित १०० मीटरचे अंतर पार करीत होत्या. त्यांच्या धावण्याचा वेग सुसाट वाऱ्यासारखा होता. डोळ्याची पापणीही लवणार नाही इतक्या वेगाने ती जोडी निर्धारित अंतर पार करीत होती. हा थरारक अनुभव आपल्या डोळ्यांत साठविण्यासाठी यवतमाळ जिल्ह्यातील नागरिकांनी प्रचंड गर्दी केली होती. अखेरच्या दिवशी वेगाने धावणाऱ्या सर्व बैलजोड्यांचे रेकॉर्ड मध्य प्रदेशातील बोरीव शिवणीच्या चपरी-डोंगरी जोडीने मोडीत काढले. या जोडीने सहा सेकंद २१ पॉइंटमध्ये निर्धारित अंतर कापले. ही जोडी एक लाखाच्या ‘विदर्भ केसरी शंकरपट पुरस्कारा’तील पहिल्या क्रमांकाची मानकरी ठरली.
विदर्भ केसरी शंकरपटाच्या चुरशीच्या लढतीत अखेरच्या दिवशी मध्य प्रदेशातील युवा महोत्सव समिती आणि पंंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने यवतमाळात विदर्भ केसरी शंकरपटाचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत तीन दिवसांत ११२ जोड्या धावल्या. यात मध्य प्रदेशातील अजिमभाई पटेल यांच्या चपरी-डोंगरी या या जोडीने प्रथम क्रमांकाचे बक्षीस मिळविले. या जोडीने ६ सेकंद २१ पॉइंटमध्ये निर्धारित अंतर पूर्ण केले. या जोडीला एक लाख रुपयांचे प्रथम क्रमांकाचे बक्षीस, स्मृतिचिन्ह आणि शाल, श्रीफळ देऊन गौरविण्यात आले.
विदर्भ केसरी शंकरपटात सहभागी होण्यासाठी राज्यातल्या काेनाकोपऱ्यातून यवतमाळात बैलजोड्या दाखल झाल्या होत्या. तीन दिवसांत या ठिकाणी दाखल झालेल्या बैलजोड्यांपैकी ११२ बैलजोड्यांनी प्रत्यक्ष शर्यतीत सहभाग नाेंदविला होता. शंकरपट पाहण्यासाठी जिल्ह्यातून आलेल्या नागरिकांनी अखेरच्या दिवशी मोठी गर्दी केली होती. प्रत्येक क्षणाला ही स्पर्धा उत्कंठा वाढविणारी राहिली. अखेरच्या दिवशी मध्य प्रदेश, मराठवाड्यासह जिल्ह्यातील जोड्यांनी मैदान गाजविले.
करोडी येथील मनोहर चव्हाण यांच्या ओम-वादळ जोडीने ६ सेकंद २४ पॉइंटमध्ये अंतर पार केले. या जोडीला ७७ हजारांचे दुसरे तर वाघापुरातील आकाश राऊत यांच्या राजा-बादशाह जोडीने ६ सेकंद २७ पॉइंटमध्ये अंतर पूर्ण केले. या जोडीला ५१ हजार रुपयांचे तिसरे बक्षीस मिळाले. विजेत्या स्पर्धकांना रोख रक्कम आणि स्मृतिचिन्हांसह गौरविण्यात आले. जनरल गटात १५ पुरस्कार वितरित करण्यात आले. तर गट क या गटात १५ पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.