यवतमाळ-वाशिममध्ये दोन्ही सेनेत काट्याची झुंज; वंचितचा अर्ज बाद झाल्याने दुरंगी लढत
By विशाल सोनटक्के | Published: April 17, 2024 05:35 AM2024-04-17T05:35:05+5:302024-04-17T05:35:27+5:30
१९९९ पासून सलग पाच वेळा निवडणुका जिंकत शिवसेनेच्या भावना गवळी यांनी इतिहास रचला.
विशाल सोनटक्के, लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : २५ वर्षांपासून शिवसेनेचा अभेद्य गड अशी ओळख असलेल्या यवतमाळ-वाशिम मतदारसंघात यंदा उद्धवसेना व शिंदेसेना आमने-सामने ठाकले आहेत. या चुरशीच्या लढाईत उद्धवसेना जिंकणार की शिंदेसेना बाजी मारणार, याकडे लक्ष लागले आहे. या मतदारसंघात यवतमाळसह राळेगाव, दिग्रस आणि पुसद हे चार तर वाशिम जिल्ह्यातील वाशिम आणि कारंजा हे दोन विधानसभा मतदारसंघ येतात. १९९९ पासून सलग पाच वेळा निवडणुका जिंकत शिवसेनेच्या भावना गवळी यांनी इतिहास रचला.
मध्यंतरी सेनेतील बंडाळीवेळी त्यांनी उद्धवसेना सोडून शिंदेसेनेत प्रवेश केला. मात्र, ॲन्टीइनकम्बन्सीच्या भीतीने शिंदेसेनेने गवळी यांच्याऐवजी यावेळी राजश्री पाटील यांना महायुतीकडून रिंगणात उतरविले आहे. दुसरीकडे नेहमीप्रमाणे काँग्रेस उमेदवाराऐवजी महाविकास आघाडीकडून उद्धवसेनेचे संजय देशमुख मैदानात उतरले आहेत. देशमुख यांचा पारंपरिक पद्धतीने प्रचार सुरू आहे. त्यांना काँग्रेसची साथ मिळत आहे. तर ऐनवेळी मैदानात उतरलेल्या राजश्री पाटील यांच्या पाठीशी आमदारांचे पाठबळ आहे. अत्यंत कमी काळात त्यांनी मतदारसंघात हायटेक प्रचारयंत्रणा उभारत तोडीसतोड प्रचार सुरू केल्याने चुरस वाढली आहे.
२६ एप्रिल रोजी दुसऱ्या टप्प्यात मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. तत्पूर्वी मतदारसंघातील प्रत्येक गावापर्यंत पोहोचण्याचा दोन्ही उमेदवारांचा प्रयत्न आहे.
महायुतीला मिळणार का आमदारांचे बळ?
मतदारसंघात सहा विधानसभा मतदारसंघ आहेत. यातील यवतमाळ, राळेगाव, वाशिम आणि कारंजा हे चार मतदारसंघ भाजपच्या ताब्यात आहेत. दिग्रस विधानसभेत सध्या शिंदेसेनेचे संजय राठोड तर पुसद मतदारसंघ इंद्रनील नाईक यांच्या रूपाने अजित पवार यांच्या राष्ट्रवादीकडे आहे. मतदारसंघातील सर्व सहाही आमदार महायुतीचे असल्याने याचा फायदा महायुतीच्या राजश्री पाटील यांना होऊ शकतो.
एकूण मतदार २१,६१,१६८
पुरुष ११,१५,०९३
महिला १०,४६,०२३
तर दुसरीकडे वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराचा अर्ज बाद झाल्याने महाविकास आघाडीला दिलासा मिळाला आहे. मागील लोकसभा निवडणुकीत ९४ हजारांवर मते वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराने खेचली होती. यंदा लोकसभेच्या मैदानात वंचितचा उमेदवार नसल्याने ही मते महाविकास विकास आघाडीकडे वळल्यास संजय देशमुख यांचे बळ वाढू शकते.
निवडणुकील कळीचे मुद्दे
सर्वाधिक शेतकरी आत्महत्या या मतदारसंघात होतात. कापूस, सोयाबीन पिकांच्या भावासह शेतकऱ्यांचे प्रश्न याही निवडणुकीत ऐरणीवर आहेत.
मागील २० वर्षांत एकही मोठा उद्योग आलेला नाही. त्यामुळे बेरोजगारीचा प्रश्न
मोठा आहे. दोन्ही पक्षांकडून याहीवेळी आश्वासने दिली जात आहेत.
यंदा पहिल्यांदाच लोकसभा निवडणुकीत हात हे चिन्ह नाही. दोन्ही शिवसेनेचेही चिन्ह बदलले आहे. हे चिन्ह पोहोचविण्याचे आव्हान उमेदवारांपुढे आहे.
२०१९ मध्ये काय घडले?
भावना गवळी शिवसेना (विजयी) ५,४२,०९८
माणिकराव ठाकरे काँग्रेस ४,२४,१५९
प्रवीण पवार, वंचित बहुजन आघाडी ९४,२२८
नोटा ३,९६६
२०१९ पूर्वीच्या निवडणुकीत कोणाची बाजी?
वर्ष विजयी उमेदवार पक्ष मते टक्के
१९९८ उत्तमराव पाटील काँग्रेस २,९१,४१५ ४७.७०
१९९९ उत्तमराव पाटील काँग्रेस २,५८,५३५ ४२.००
२००४ हरिभाऊ राठोड भाजप २,९८,५१३ ४४.९४
२००९ भावना गवळी शिवसेना ३,८४,४४३ ४५.७६
२०१४ भावना गवळी शिवसेना ४,७७,९०५ ४६.२४
दुखावल्या गेलेल्या गवळी यांची भूमिका राहणार महत्त्वाची
या मतदारसंघावर बंजारा, कुणबी, आदिवासी, दलित आणि मुस्लीम या घटकांचे प्राबल्य आहे. त्यातही बंजारा आणि कुणबी मतदार बहुसंख्य आहेत. कुणबी मते वळविण्यासाठी दोन्ही उमेदवारांचे प्रयत्न सुरू आहेत. भावना गवळी यांची भूमिकाही महत्त्वाची असेल. भाकरी फिरविण्याच्या निर्णयामुळे दुखावलेल्या गवळी या शेवटच्या क्षणी काय भूमिका घेतात, यावरही निवडणूक निकालाचे गणित अवलंबून राहील.