पोलीस शिपायाची संविधान चौकात गुंडागर्दी; चहा विक्रेत्याला मारहाण
By सुरेंद्र राऊत | Published: October 9, 2022 04:45 PM2022-10-09T16:45:56+5:302022-10-09T16:47:46+5:30
सकाळी चौकात दारूड्या पोलीस शिपायाचा गोंधळ सुरूच होता. आरोपी शिपाई हा पोलीस मुख्यालयात कर्तव्यावर आहे.
यवतमाळ - शहरातील गुन्हेगारीचा कडेलोट झाला आहे. अशातच पोलीस शिपाईसुद्धा चौकांमध्ये गुंडागर्दी करताना दिसत आहे. वर्दीचा धाक दाखवत दारूच्या नशेत असलेल्या शिपायाने तू येथे कॅन्टींग कशी लावली, असे म्हणत चहा विक्रेत्याला मारहाण केली. त्याचे साहित्य फेकून दिले व दोन हजार रुपये हिसकावून घेतले. ही घटना रविवारी सकाळी ६.३० वाजता स्थानिक संविधान चौकात घडली. यापूर्वीही या पोलीस शिपायाचे अनेक कारनामे रेकॉर्डवर आले नाहीत.
बसस्थानक चौकात अर्जुन गणेश जाधव या चहा विक्रीचा व्यवसाय करणाऱ्या युवकाला सकाळी साडेसहा वाजता आरोपी पोलीस शिपाई संदीप सुरेश नामेकर (३१, रा. पळसवाडी) पोलीस लाईन याने मारहाण केली. संदीपने जातीवाचक शिवीगाळ करीत चहा विक्रेत्याच्या हातातील दोन हजार रुपये हिसकावून घेतले. त्यानंतर दुधाचे ट्रे, बिस्कीट पुडे या साहित्याची नासधूस केली. तू येथे कॅन्टींग लावून दाखव, तू आहे आणि मी आहे, मी तुला पाहून घेतो, जीवाने ठार केले जाईल, अशा स्वरुपाच्या धमक्या संदीप नामेकर याने चहा विक्रेत्याला दिल्या. त्याचे मोठे आर्थिक नुकसान केले.
सकाळी चौकात दारूड्या पोलीस शिपायाचा गोंधळ सुरूच होता. आरोपी शिपाई हा पोलीस मुख्यालयात कर्तव्यावर आहे. त्याच्या विरोधात चहा विक्रेत्याने दिलेल्या तक्रारीवरून अवधूतवाडी पोलिसांनी कलम ३९४, ५०४, ५०६ भादंविनुसार गुन्हा दाखल केला आहे. याचा तपास पोलीस उपनिरीक्षक चव्हाण करीत आहे.