वार्डातून गर्भवतीला हाकलले, उघड्यावर झाली प्रसूती; यवतमाळमधील धक्कादायक प्रकार!

By सुरेंद्र राऊत | Published: October 22, 2022 08:31 PM2022-10-22T20:31:00+5:302022-10-22T20:33:08+5:30

येथील वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार पूर्णत: ढेपाळला आहे. प्रत्येक जण मौजमजा करीत आहे. गरीब रुग्णांना कुणीच वाली नाही.

A pregnant woman was kicked out of the ward Open delivery | वार्डातून गर्भवतीला हाकलले, उघड्यावर झाली प्रसूती; यवतमाळमधील धक्कादायक प्रकार!

वार्डातून गर्भवतीला हाकलले, उघड्यावर झाली प्रसूती; यवतमाळमधील धक्कादायक प्रकार!

Next

यवतमाळ :

येथील वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार पूर्णत: ढेपाळला आहे. प्रत्येक जण मौजमजा करीत आहे. गरीब रुग्णांना कुणीच वाली नाही. शुक्रवारी रात्री १० वाजता स्त्रीरोग विभागातील वार्ड क्र. ३ मध्ये दाखल झालेल्या पारधी समाजाच्या महिलेला सकाळी चक्क हाकलून दिले. रात्रभर तिच्याकडे ढुंकूनही पाहिले नाही. रुग्णालय परिसरातच उघड्यावर सकाळी ८ वाजता या महिलेची प्रसूती झाली. तिनेच स्वत:च्या बाळाची नाळ तोडली. प्रसूतीनंतर ही महिला पतीसह गावी निघून गेली.

प्रतीक्षा सचिन पवार (२२) रा.बाळेगाव झोंबाडी ता.नेर असे व्यवस्थेची प्रताडणा सहन कराव्या लागणाऱ्या महिलेचे नाव आहे. प्रतीक्षाची दुसरी प्रसूती होती. ती पतीसह शुक्रवारी रात्री १०८ रुग्णवाहिकेने मेडिकलमध्ये पोहोचली. तिला वार्ड क्र. ३ मध्ये दाखल करून घेण्यात आले. तेथील डॉक्टरांनी प्रतीक्षाला रक्त देण्याची गरज असल्याचे सांगून तिच्या पतीला खासगी ब्लड बॅंकेतून रक्त पिशवी आणण्यास सांगितले. आर्थिक स्थिती नसतानाही सचिन पवार याने पत्नीसाठी १,६०० रुपये किमतीची रक्ताची बॅग आणली. ही रक्ताची पिशवी घेऊन तो पहाटे ४.३० वाजता स्त्रीरोग विभागात पोहोचला. मात्र, तोपर्यंत तेथील डॉक्टर व नर्सेस यांनी प्रतीक्षाकडे ढुंकूनही पाहिले नाही. रक्ताची पिशवी दिल्यानंतरही रक्त लावण्यात आले नाही. याची विचारणा केली असता, सचिन व त्याच्या पत्नीला शिवीगाळ करीत वार्डातून हाकलून देण्यात आले. रक्ताची पिशवीही त्यांच्या अंगावर भिरकावली. पत्नीला घेऊन सचिन शासकीय रुग्णालय परिसरातीलच मैदानात थांबला. चहा-पाणी घेत असतानाच, सकाळी ८.३० वाजता प्रतीक्षाने उघड्यावर गोंडस बाळाला जन्म दिला. उघड्यावर प्रसूती होत असल्याने, परिसरातील नागरिक तिच्या मदतीला धावून आले. मात्र, रुग्णालयातील डॉक्टरांनी प्रतीक्षाच्या वेदनेची कदर केली नाही. डॉक्टर येथे उपचार करणार नाहीत, याची खात्री पटल्याने नवजात बाळासह ओली बाळंतीण पत्नीला घेऊन सचिन आपल्या गावी पोहोचला.

गरीब रुग्णांना दिली जाते हीन वागणूक
निरक्षर असलेल्या सचिन व त्याच्या पत्नीला अतिशय हीन दर्जाची वागणूक मिळाली, ही आपबिती त्याने ‘लोकमत’कडे कथन केली. हा प्रकार शासकीय रुग्णालयात नित्याचाच झाला आहे. थातुरमातुर चौकशी करून दोषींना पाठीशी घालण्याचे काम सुरू आहे. यापूर्वी एका महिलेला गरज नसताना दुसऱ्याच महिलेचे रक्त लावले, नंतर तिला कोरोना असल्याचे सांगण्यात आले. यातच त्या महिलेचा मृत्यू झाला. ही महिलाही अतिशय मागास संवर्गातील होती.

पालकमंत्र्यांच्या मतदारसंघातील रुग्णांचे हाल
रुग्णसेवक म्हणवून घेणारे पालकमंत्री संजय राठोड यांच्या मतदारसंघातील गरीब रुग्णांचे हाल होत आहे. प्रतीक्षा पवार हीसुद्धा नेर तालुक्यातील आहे. रुग्णालयातील गैरसुविधांकडे पालकमंत्र्यांनी गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे. केवळ घोषणा करून चालणार नाही, येथे कणखर प्रशासक आणि रिक्त पदे तत्काळ भरण्याची आवश्यकता आहे, तरच गोरगरीब रुग्णांना न्याय मिळू शकतो. ही सुविधा देऊ शकत नसेल, तर संजय राठोड यांनी रुग्णसेवक हे बिरुद लावू नये, असा सूर रुग्णालय वर्तुळातून ऐकायला मिळत आहे.

Web Title: A pregnant woman was kicked out of the ward Open delivery

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.