डाॅक्टरच्या चुकीने गर्भवती महिलेची प्रकृती गंभीर; दुसऱ्याच रुग्णाचे रक्त दिल्याचा पतीचा आरोप
By सुरेंद्र राऊत | Published: September 24, 2022 04:13 PM2022-09-24T16:13:44+5:302022-09-24T16:14:19+5:30
शासकीय रुग्णालयातील प्रकार
यवतमाळ : येथील वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात सावळा गोंधळ सुरू आहे. प्रशासनावर कुणाचीही पकड नाही. यामुळे दैनंदिन कामात एक-ना-अनेक चुका घडत असतात. ताप असल्यामुळे आठ महिन्याची गर्भवती महिला सोमवारी रुग्णालयात दाखल झाली. वार्डातील डॉक्टरने दुसऱ्या रुग्णासाठी आणलेले रक्त या महिलेला दिले. यानंतर महिलेची प्रकृती गंभीर झाली आहे. हा सर्व प्रकार डॉक्टरच्या चुकीमुळे घडल्याचा आरोप पतीने केला आहे.
माया किशोर गाडेकर (२२) रा. माऊली ता. बाभूळगाव असे या महिलेचे नाव आहे. मायाला ताप, खोकला, डोकेदुखी हा आजार झाल्याने १९ सप्टेंबरच्या रात्री शासकीय रुग्णालयात आणण्यात आले. तिला वार्ड क्र. १३ मध्ये डॉक्टरांनी दाखल केले. या वार्डात माया नावाची दुसरी महिलासुद्धा लागूनच उपचार घेत होती. रात्री पाळीतील डॉक्टरने रक्ताची पिशवी आणून माया गाडेकर हिला रक्त लावले. यानंतर अर्धातासाच तिची प्रकृती गंभीर झाली. तिला झटके यायला लागले.
चुकीने रक्त लावण्यात आल्याचा प्रकार उघड झाल्यानंतर मायाला रात्री २ वाजता अतिदक्षता कक्षात दाखल केले. नंतर २० सप्टेंबर रोजी मायाची प्रकृती थोडीशी सुधारली. २१ सप्टेंबरला आणखी प्रकृती बिघडली. दरम्यान, डॉक्टरांनी तिची कोरोना तपासणी केली होती. आठ महिन्याची गर्भवती माया कोरोना पॉझिटिव्ह असल्याचा अहवाल आला. मायाला कोरोना वार्डात हलविण्यात आले. शुक्रवारपासून तिच्यावर तेथे उपचार सुरू आहे. मात्र मायाची प्रकृती गंभीर होत असल्याचे सांगितले जाते. हा सर्व प्रकार गरज नसताना रक्त दिल्यामुळे झाल्याचा आरोप मायाचे पती किशोर गाडेकर यांनी केला आहे.
आधी रुग्णाला वाचविण्याचा प्रयत्न केला जात आहे. मेडिसीनचे युनिट असल्याने त्या विभागाचे प्रमुख रुग्णावर लक्ष देवून आहे. महिलेची प्रकृती सुधारत असल्याचे सांगण्यात आले. या प्रकरणात नंतर चौकशी केली जाईल.
- डॉ. मिलिंद फुलपाटील, अधिष्ठाता, शासकीय रुग्णालय