स्वस्त सोन्याचा लोभ नडला.. सेवानिवृत्त पोलिसाला ११ लाखांना लुटले; टोळक्याने मारहाण, पिस्टलही पळविली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2022 03:20 PM2022-03-28T15:20:43+5:302022-03-28T15:59:03+5:30
दबा धरून असलेल्या टोळक्याने सोने खरेदीसाठी आलेल्या पोलीस कर्मचाऱ्यासह त्यांच्या मुलाला व साथीदाराला बेदम मारहाण केली. त्यानंतर ते टोळके तेथून पसार झाले.
यवतमाळ : येथील मोटार वाहन विभागातील सेवानिवृत्त सुपरवायझर सोन्याचे नाणे खरेदीत गंडविले गेले. खामगाव तालुक्यातील (बुलडाणा) घरोडा फाटा लोखंडा शिवारात ११ लाख ६६ हजार रुपयांना त्यांना लुटले. इतकेच नव्हे तर त्यांचे पिस्टल घेऊन टोळके फरार झाले. याप्रकरणी हिवरखेड पोलिसांनी दहाजणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
ही घटना २५ मार्च शुक्रवारी दुपारी घडली. राजेंद्र चंदूलाल जाधव, रा. राठोड लेआउट, नर्सिंगनगर, वडगाव असे सेवानिवृत्त पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे. त्यांना अनिल चंदू भोसले, अभिषेक भोसले, दीपक चव्हाण, दिनकर भोसले यांच्यासह इतर आठजणांनी मारहाण करून लुटले.
राजेंद्र जाधव यांना त्यांचे विश्वासू शेखर माळवदे व अतुल नेवारे (दोघे रा. मसोला आर्णी) यांनी एका व्यक्तीला शेतात सोने मिळाले आहे, ते विकायचे आहे, असे सांगितले. यासाठी राजेंद्र जाधव मुलगा अनुप जाधव, दिनेश गुंडवारे, धरमसिंग गुडावरे, प्रेम सिंग राठोड यांना घेऊन सकाळी सात वाजता खामगाव येथे आले. नंतर त्यांनी सोने विकणाऱ्यांशी संपर्क केला.
धारूड फाटा येथे दोघाजणांनी राजेंद्र जाधव यांच्याकडे रोख असल्याची खात्री केली व नंतर पुढे नेले. तिथे दबा धरून बसलेल्या आठ ते दहाजणांनी हल्ला चढविला. यात रोख ५ लाख, पाच राऊंड असलेली पिस्टल, सोन्याची अंगठी, चेन असा ११ लाख ६६ हजार ३५० रुपयांचा मुद्देमाल हिसकावून घेतला. दबा धरून असलेल्या टोळक्याने सोने खरेदीसाठी आलेल्या पोलीस कर्मचाऱ्यासह त्यांच्या मुलाला व साथीदाराला बेदम मारहाण केली. त्यानंतर ते टोळके तेथून पसार झाले.
मारहाणीच्या घटनेतून कसेबसे सावरल्यानंतर राजेंद्र जाधव यांनी २६ मार्चला रात्री बारा वाजता हिवरखेड पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. याप्रकरणी पोलिसांनी विविध कलमांनुसार गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यातील एका आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
पोलिसालाही आवरला नाही मोह
शेतात सापडलेले, घरात खोदकामात मिळालेले सोने स्वस्तात विक्रीचे बहाणे करून अनेकांची फसवणूक होते. असे गुन्हे पोलीस ठाण्यात अनेकदा दाखल होतात. खुद्द पोलीस विभागात काम करून सेवानिवृत्त झालेल्या सुपरवायझरलासुद्धा मोह आवरता आला नाही. बुलडाणा जिल्ह्यात बेदम मार खाऊन साडेअकरा लाखांची रोकड गेली, ही चर्चा पोलीस दलात रंगत आहे.