सोयाबीनच्या पडलेल्या दराला वाचविण्यासाठी सोशल वॉर

By ऑनलाइन लोकमत | Published: August 29, 2024 05:30 PM2024-08-29T17:30:07+5:302024-08-29T17:32:23+5:30

मुख्यमंत्र्यांना केले टॅग : 'अब की बार सोयाबीन सहा हजार पार'

A social war to save the falling price of soybeans | सोयाबीनच्या पडलेल्या दराला वाचविण्यासाठी सोशल वॉर

A social war to save the falling price of soybeans

लोकमत न्यूज नेटवर्क 
यवतमाळ :
खुल्या बाजारात सोयाबीनचे दर ३८०० रुपयांपर्यंत खाली घसरले आहेत. पुढील काळात हे दर आणखी खाली येणार असल्याची स्थिती आहे. यामुळे शेतकऱ्यांना फटका बसण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत सरकारने यावर पावले उचलावी म्हणून काँग्रेसच्या सोशल मीडियाने पावले उचलली आहेत. 'अब की बार सोयाबीन सहा हजार पार' या टॅगलाइनचा वापर करत मोहीम सुरू केली आहे. यात थेट मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि कृषिमंत्र्यांना टॅग केले जात आहे.


विद्यमान सरकार शेतकऱ्यांच्या बाबतीत संवेदनशील असल्याचे दाखवत आहे. प्रत्यक्षात शेतमालाचे दर पडल्यानंतर ते सावरण्यासाठी कुठलीच उपाययोजना केली जात नाही. यातून शेती अडचणीत आली आहे. यावर मात करण्यासाठी थेट सोशल मीडियावरून रान उठविले जात आहे. प्रत्यक्ष आंदोलनासह सोशल मीडियावर या पद्धतीने आता आंदोलन छेडण्यात आले आहे. 


यामध्ये इन्स्टाग्राम, फेसबुक, यूट्यूब, एक्स या सोशल मीडियावर यवतमाळ जिल्ह्यातील तरुण शेतकऱ्यांनी व्यक्त होणे सुरू केले आहे. त्यात थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, कृषिमंत्री धनंजय मुंडे यांना टॅग केले जात आहे. यातून सोशल मीडियावर वादळ उठले आहे. 


सोयाबीन दरातील पडझडीविरोधात सोशल मीडिया काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष कृष्णा पुसनाके यांच्या नेतृत्वाखाली ही मोहीम हाती घेतली आहे. यवतमाळ जिल्ह्यातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकरी नारायणराव बेंडे यांच्या ग्राम रातचांदना येथील शेतातून मोहिमेला सुरुवात करण्यात आली आहे. यामुळे पुढील काळात ही मोहीम अधिक गतिशील होण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. 


अशी झाली दरात पडझड 
२०२३-२४ या वर्षात सोयाबीनचा हमीभाव ४,६०० रुपये होता. गेल्यावर्षी ३५०० ते ४००० रुपये याच दराने सोयाबीनचे व्यवहार झाले. हमीदराच्या तुलनेत क्विंटलमागे ६०० ते ७०० रुपयांचे नुकसान शेतकऱ्यांना सोसावे लागले. २०२४-२५ करिता शासनाने ४८९२ रुपये हमीभाव जाहीर केला आहे. खुल्या बाजारात दर घसरले आहेत. त्यात केंद्र शासनाने खाद्यतेल आयातीचा सपाटा लावला आहे. यामुळे सोयाबीनचे दर दबावात राहण्याचा धोका आहे. ३५०० ते ३८०० पर्यंत दर खाली येण्याचा धोका आहे. 


मोहिमेत स्मार्टफोनचा वापर 
या मोहिमेच्या शुभारंभाप्रसंगी सोयाबीन उत्पादक शेतकरी नारायणराव बेंडे, युवा शेतकरी शुभम बेंडे, सोशल मीडिया काँग्रेस कमिटी जिल्हाध्यक्ष कृष्णा पुसनाके, संभाजी ब्रिगेड जिल्हा सचिव सचिन मनवर, प्रा. पंढरी पाठे, नीलेश आगलावे, पार्वताबाई उमाटे, अशा वरणकार, रुखमा मेश्राम, चंदा वरणकर आदी उपस्थित होते.


 

Web Title: A social war to save the falling price of soybeans

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.