धाराशिव येथील विद्यार्थिनीची यवतमाळच्या वैद्यकीय कॉलेजमध्ये आत्महत्या 

By सुरेंद्र राऊत | Published: December 29, 2023 04:37 PM2023-12-29T16:37:09+5:302023-12-29T16:37:16+5:30

मध्यरात्रीची घटना, जेवणाचा डबा उशिरापर्यंत खोलीबाहेर असल्याने आला संशय 

A student from Dharashiv committed suicide in Yavatmal Medical College | धाराशिव येथील विद्यार्थिनीची यवतमाळच्या वैद्यकीय कॉलेजमध्ये आत्महत्या 

धाराशिव येथील विद्यार्थिनीची यवतमाळच्या वैद्यकीय कॉलेजमध्ये आत्महत्या 

यवतमाळ : येथील वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात एमबीबीएस प्रथम वर्षाला असलेल्या विद्यार्थिनीने गळफास लावून आत्महत्या केली. ही घटना गुरुवारी  मध्यरात्री उघडकीस आली. वसतिगृहात राहणाऱ्या इतर विद्यार्थिनींमुळे हा प्रकार उघडकीस आला. यानंतर पोलिसांना पाचारण करून पंख्याला लटकलेला मृतदेह बाहेर काढण्यात आला. 

सुहानी सहदेव ढोले (१९) रा. धाराशिव असे या विद्यार्थिनीचे नाव आहे. सुहानी हिने शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश घेऊन जेमतेम तीन महिन्याचा कालावधी पूर्ण झाला. ती तिच्या मैत्रिणीसोबत रुळली होती. गुरुवारी रात्री तिने ओढणीने वसतिगृहातील खोलीमध्ये गळफास बांधला व त्याला लटकून आत्महत्या केली. सुहानीच्या खोलीबाहेर रात्रीचा डबा उशिरापर्यंत तसाच ठेऊन होता. यावरून इतर मुलींनी तिला उठविण्यासाठी दार ठोठावले, प्रतिसाद मिळत नसल्याने खिडकीतून डोकावून बघितले असता धक्कादायक प्रकार पुढे आला.

याची माहिती वैद्यकीय अधीक्षक डॉ. विवेक गुजर यांना देण्यात आली. डॉ. गुजर यांनी रात्रीच वसतिगृह गाठले. यवतमाळ शहर पोलिसांनाही घटनेची माहिती दिल्यानंतर शहर पोलिसांचे पथक तत्काळ पोहोचले. पंचासमक्ष सुहानीचा मृतदेह खाली काढण्यात आला. यावेळी सुहानीने लिहिलेली चार लाईनची सुसाईडनोट आढळून आली. त्यामध्ये मृत्यूला कुणीही जबाबदार नसल्याचे नमूद करीत त्याखाली सुहानीने स्वाक्षरी केली होती. हे सर्व साहित्य पोलिसांनी घटनास्थळावरून जप्त केले आहे.

घटनेची माहिती मिळाल्यानंतर सुहानीचे वडील व मामा तातडीने यवतमाळात पोहोचले. मुलीला भेटण्यासाठी त्यांना थेट शवागृहातच जावे लागले. मुलीचा मृतदेह पाहून दोघांनीही हंबरडा फोडला. या प्रकरणात शहर पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद घेतली आहे. अधिष्ठाता डॉ. गिरीष जतकर यांनी सुहानीच्या वडिलांची भेट घेतली व त्यांची सांत्वना केली. वैद्यकीय महाविद्यालयात या घटनेने खळबळ उडाली आहे. सुहानीने हे टोकाचे पाऊल का उचलले हा प्रश्न कायम आहे. त्याचा शोध घेणार असल्याचे ठाणेदार सतीश चवरे यांनी सांगितले.

Web Title: A student from Dharashiv committed suicide in Yavatmal Medical College

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.