उन्हाळा आला, एसटी सुरक्षित करू चला; दोन आठवडे मोहीम

By विलास गावंडे | Published: March 10, 2024 04:14 PM2024-03-10T16:14:26+5:302024-03-10T16:15:01+5:30

गडचिरोली, अमरावती जिल्ह्यातील घटनांचा धसका

A thorough inspection of ST buses is going to be done in all depots and workshops in Yavatmal. | उन्हाळा आला, एसटी सुरक्षित करू चला; दोन आठवडे मोहीम

उन्हाळा आला, एसटी सुरक्षित करू चला; दोन आठवडे मोहीम

यवतमाळ : एसटी बसला आग लागण्याच्या घटना वाढीस लागल्या आहे. उन्हाळ्यात हा प्रकार अधिक होतो. गडचिरोली आणि अमरावती जिल्ह्यात अलीकडेच घडलेल्या दोन घटनांचा महामंडळाने चांगलाच धसका घेतला आहे. विदर्भात १६ दिवस विशेष मोहीम राबविली जाणार आहे. विभागीय स्तरावर सर्व आगार आणि कार्यशाळांमध्ये एसटी बसची सखोल तपासणी केली जाणार आहे.

उन्हाळ्याच्या दिवसात वाढत्या तापमानासोबतच वायरिंगमधील शॉर्टसर्किटमुळे आग लागण्याची शक्यता अधिक असते. १ मार्च रोजी गडचिरोली आगाराच्या बसची बॅटरी फुटून जळाल्याने आग लागली. तेथून तीन दिवसानेच ५ मार्च रोजी अमरावती क्र.१ आगाराच्या मार्गस्थ असलेल्या बसच्या बॅनेटमधून धूर निघून आगीची किरकोळ घटना घडली. असे प्रकार पुढे वाढू नये, त्याला ब्रेक लागावा यासाठी मोहीम राबविली जाणार आहे.

१२ ते १७ मार्च या कालावधीत आगार आणि विभागीय कार्यशाळांमध्ये राबविल्या जाणाऱ्या मोहिमेमध्ये कोणत्या बाबी तपासल्या पाहिजे, याविषयीचे दिशानिर्देश नियंत्रण समिती क्र.३च्या (नागपूर) उपमहाव्यवस्थापकांनी दिले आहेत. एसटी बसेससोबतच महाकार्गो मालवाहू ट्रकचीही तपासणी करण्याचे आदेश देण्यात आले आहे.

बॅटरीची मेन केबल कुठल्याही मेटल पार्टला आणि इतर वायरला घासत नसल्याची तसेच बॅटरी केबलवर आच्छादन असल्याची खात्री करून घ्यायची आहे. सेन्सर वायरिंग किंवा इतर वायर इंजीन बॉडीला स्पर्श करीत नाही अशा पद्धतीने रुटिंग आणि क्लॅपिंग केल्याची तपासणी केली जाणार आहे. इंजीन बॉनेटवर असलेला गिअर लिव्हर बूट सुस्थितीत नसल्यास आणि त्या ठिकाणी ट्यूबचे, रेग्झिनचे तुकडे वापरले असल्यास काढून टाकण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत.

चालकाची केबीन, बल्क हेड पार्टिशन किंवा वाहनाच्या प्रवासी कक्षात स्पेअर टायर किंवा ज्वलनशील वस्तू असल्यास त्या काढून टाकण्याचे निर्देश देण्यात आले. इंजीन योग्य प्रकारे कुलिंग होत असल्याची, ओव्हर हीट होत नसल्याची आणि रेडिएटर-टँक लिकेज नसल्याची खात्री करून घेण्याच्या सूचना करण्यात आल्या आहे.

अग्निशमन उपकरणांची पाहणी
एसटी बसमध्ये योग्य क्षमतेचे आणि वैध मुदतीचे अग्निशमन उपकरण असल्याची खात्री मोहीम काळात केली जाणार आहे. शिवाय हे उपकरण कार्यरत आहे की नाही याचीही खातरजमा करावी लागणार आहे. परंतु लागलेले उपकरण चालवायचे कसे, याचे प्रशिक्षण कर्मचाऱ्यांना मिळाले नसल्याचे वास्तव आहे.

Web Title: A thorough inspection of ST buses is going to be done in all depots and workshops in Yavatmal.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.