बापरे... कोळसा खाणीत शिरली वाघीण ! व्हिडीओ व्हायरल, वनविभागाचा हालचालीवर वॉच
By ऑनलाइन लोकमत | Published: February 22, 2024 06:07 AM2024-02-22T06:07:42+5:302024-02-22T06:08:02+5:30
सुगनेगाव, घोन्सा या परिसरात गेल्या काही दिवसांपासून वाघिणीचा वावर आहे. मध्यंतरी याच वाघिणीचे दोन बछडे भुकेने व्याकूळ होऊन सुकनेगाव येथील एका तलाव परिसरात मृत्युमुखी पडले होते. त्यानंतर ही वाघीण एका बछड्याला घेऊन याच परिसरात फिरत आहे.
वणी (जि. यवतमाळ) : तालुक्यातील घोन्सा येथील खुल्या कोळसा खाणीत मंगळवारी सकाळी एका वाघिणीने दर्शन दिले. कोळसा वाहतूक करणाऱ्या ट्रकचालकाने या वाघिणीला आपल्या कॅमेऱ्यात कैद केले. त्यानंतर हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला असून या प्रकारामुळे खाण कामगारांत भीतीचे वातावरण पसरले आहे. वनविभागानेही या घटनेला दुजोरा दिला आहे.
सुगनेगाव, घोन्सा या परिसरात गेल्या काही दिवसांपासून वाघिणीचा वावर आहे. मध्यंतरी याच वाघिणीचे दोन बछडे भुकेने व्याकूळ होऊन सुकनेगाव येथील एका तलाव परिसरात मृत्युमुखी पडले होते. त्यानंतर ही वाघीण एका बछड्याला घेऊन याच परिसरात फिरत आहे. मंगळवारी सकाळी ही वाघीण घोन्सा कोळसा खाणीतील मातीच्या एका ढिगाऱ्यावर फिरत असल्याचे दिसून आले. कोळसा वाहतूक करणाऱ्या ट्रकचालकासह अनेक कामगारांनी या वाघिणीला पाहिले. त्यामुळे त्यांचा थरकाप उडाला. या परिसरात ट्रॅप कॅमरे लावले असून वनविभाग वाघिणीच्या हालचालीवर वॉच ठेवून आहे.
...अन् बिबट्या उडी मारून झाला पसार
डोंगरखर्डा शिवारात मंगळवारी भरदिवसा बिबट्या दृष्टीस पडला. डोंगरखर्डा-राळेगाव मार्गावर शौकत अली सय्यद यांच्या शेतातील सिरसाच्या झाडावर या बिबट्याने ठाण मांडले होते. झाडावर बिबट असल्याची माहिती पसरताच या परिसरात बघ्यांनी मोठी गर्दी केली होती.
वन विभागाचे पथकही रेस्क्युसाठी झटत होते. मंगळवारी रात्रभर तसेच बुधवारी सायंकाळपर्यंत बिबट्या या झाडावरच ठाण मांडून होता. सायंकाळी ६ च्या सुमारास अचानक बिबट्याने खाली झेप घेत जंगलाच्या दिशेने पळ काढला.