सव्वालाख पुस्तकांंचा खजिना, पण वाचकांची संख्या घटल्याने जिल्हा ग्रंथालय पडले ओस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2022 11:44 AM2022-04-23T11:44:20+5:302022-04-23T12:03:01+5:30
यवतमाळ जिल्ह्यात ३५३ ग्रंथालये आहेत. या ठिकाणी विविध पुस्तकांचे संच आजही कायम आहेत. मात्र, या पुस्तकांना वाचणारी मंडळी कमी झाली आहे. यामुळे ज्ञानसंपदा धोक्यात आल्याचे चित्र आहे.
यवतमाळ : ‘वाचाल तर वाचाल’ हा शब्दप्रयाेग तंतोतंत खरा ठरविण्याचे काम विद्यादानातून प्रत्येकाच्या आयुष्यात येतो. मात्र, अलीकडे सोशल मीडियाने वाचन संस्कृतीच अडचणीत आणली आहे. यवतमाळच्या जिल्हा ग्रंथालयात सव्वालाख पुस्तकांचा खजिना आहे. कथा, कादंबऱ्या, आत्मचरित्र असे पुस्तकांचे विविध प्रकार या ठिकाणी आहेत. मात्र, या पुस्तकांना वाचणारी मंडळी कमी झाली आहे. यामुळे ज्ञानसंपदा धोक्यात आल्याचे चित्र आहे.
यवतमाळ जिल्ह्यात ३५३ ग्रंथालये आहेत. या ठिकाणी विविध पुस्तकांचे संच आजही कायम आहेत. वाचन संस्कृती रुजावी आणि विपुल ज्ञान प्रत्येकाच्या घरापर्यंत पोहोचावे म्हणून ग्रंथालयाची संकल्पना पुढे आली. पूर्वीच्या काळी वाचक वर्ग मोठा होता. आता पुस्तक वाचणारे वाचक फारच कमी झाले आहे. केवळ ग्रंथालयांमध्ये स्पर्धा परीक्षेसाठी अभ्यास करणारी मंडळी पाहायला मिळत आहे. दोन्ही घटक महत्त्वाचे असले तरी केवळ स्पर्धा परीक्षेचा वर्ग वाढत चालला आहे. वैयक्तिक वाचन करणारा वर्ग कमी होत चालला आहे.
यवतमाळच्या जिल्हा ग्रंथालयात एक लाख २९ हजार पुस्तके आहेत. या ठिकाणी १३८१ वैयक्तिक सभासद आहेत, तर ११० संस्था सभासद आहेत. दोनशे विद्यार्थी ग्रंथालयामध्येच स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करीत आहेत. अद्ययावत अशी एपीजे अब्दुल कलाम अभ्यासिका विदर्भातील सर्वांत सुसज्ज अभ्यासिका म्हणून ओळखली जाते. या ठिकाणी सर्वाधिक पुस्तके आहेत. याशिवाय संपूर्ण व्यवस्था वातानुकूलित आहे. अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर या ठिकाणी करण्यात आला आहे. याशिवाय दगडी चाळीतील जिल्हा ग्रंथालयात स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करण्यासाठी अनेक युवक दररोज ये-जा करतात.
सकाळी १० वाजेपासून ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत ही अभ्यासिका खुली असते. यामुळे विद्यार्थ्यांना एमपीएससी, यूपीएससी स्पर्धा परीक्षा, सरळसेवा, सीईटी, अभियांत्रिकी, पोलीस भरती या परीक्षेचा अभ्यास करण्यासाठी मुबलक पुस्तके ग्रंथालयात आहेत. या पुस्तकांच्या अभ्यासातूनच अनेक विद्यार्थी यूपीएससी परीक्षेत उत्तीर्ण झाले आहेत. अनेकांना नोकरीही लागली आहे. आता ही संख्या वाढल्याने स्पर्धा परीक्षेतून शासकीय सेवेत जाणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या वाढण्यास ग्रंथालय मोलाची भूमिका बजावणार आहे.
कादंबरी वाचक वर्ग गेला कुठे?
अलीकडच्या काळात प्रत्येक गोष्टी तत्काळ मिळावी असाच प्रत्येकाचा प्रयत्न असतो. रिकामा वेळ कितीही गेला तरी वाचनासाठी मात्र कुणी वेळच काढत नाही. उन्हाळ्याच्या सुटीत वाचले जाणारे कॉमिक्स आणि मनोरंजन कथांची पुस्तके याला बच्चे कंपनी हात लावत नाही. तरुण वर्ग कादंबऱ्या, कथा, आत्मचरित्र, संदर्भग्रंथ याचे वाचन करीत नाही. यामुळे पूर्वी घडलेल्या घटना पुस्तकातच बंद झाल्या आहेत. त्यासाठी ग्रंथालयांना आता नवीन मोहीम हाती घ्यावी लागणार आहे.
जिल्हा ग्रंथालयाने वाचन संस्कृती रुजविण्यासाठी विविध उपक्रम हाती घेतले आहेत. याशिवाय ग्रंथालयातून अधिक विद्यार्थी स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करीत आहेत. पुस्तकांमुळे अनेकांना समोरची दिशा मिळाली आहे, तर अनेकांना नोकरीचा मार्गही गवसला आहे.
- राजेंद्र कोरे, जिल्हा ग्रंथपाल, यवतमाळ