विधीसंघर्षग्रस्त बालकांची अनोखी दिवाळी; पणत्या, ग्रिटिंग कार्डचे न्यायाधीशांकडून कौतुक
By ऑनलाइन लोकमत | Published: November 10, 2023 04:43 PM2023-11-10T16:43:33+5:302023-11-10T16:46:27+5:30
आनंद मेळावा : बालकांना दिवाळीनिमित्त विविध भेटवस्तू
यवतमाळ : अजाणत्या वयात झालेल्या चुकांमुळे निरीक्षणगृहात, बालगृहात आलेल्या विधीसंघर्षग्रस्त बालकांनीही यंदा अनोख्या पद्धतीने दिवाळी साजरी केली. त्यांच्यासाठी खास आनंद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यात या मुलांनी तयार केलेल्या आकर्षक पणत्या, ग्रिटिंग कार्ड पाहून जिल्हा न्यायाधीशांनीही कौतुक केले.
न्या. ईना धांडे यांच्या संकल्पनेतून येथील शासकीय निरीक्षणगृह व बालगृहात हा कार्यक्रम झाला. यावेळी बालकांनी स्वत: सजविलेल्या पणत्या, शंखापासून तयार केलेले पेपरवेट, पोस्टर्स (पेंटीग्स), ग्रिटिंग्स व स्वादिष्ट खाद्यपदार्थांचे (स्नॅक्स) प्रदर्शन भरविण्यात आले. तसेच बालकांनी देशभक्तीपर गीते, समूहनृत्य सादर केले. बालकांनी बनविलेल्या खाद्यपदार्थाचा सर्व पाहुण्यांनी आस्वाद घेतला. त्यांच्या कलाकृतीची प्रशंसा केली. या प्रसंगी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. व्ही. हांडे यांनी बालकांशी संवाद साधला. त्यांच्या बालपणीच्या आठवणी व्यक्त केल्या. बालकांना दिवाळीनिमित्त विविध भेटवस्तू दिल्या.
आनंद मेळाव्यासाठी प्रमुख पाहुणे जिल्हा प्रमुख व सत्र न्यायाधीश एस. व्ही. हांडे, अतिरिक्त जिल्हा प्रमुख व सत्र न्यायाधिश क्र. २ ए. ए. लऊळकर, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणा सचिव कुणाल नहार, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी प्रशांत थोरात, तसेच जिल्हा न्यायालयातील सर्व न्यायाधीश, विधीज्ञ, पोलीस विभाग, महिला व बाल विकास विभागाचे अधिकारी व कर्मचारी, बाल कल्याण समिती सदस्य उपस्थित होते. विधीसंघर्षग्रस्त बालकांकरिता असा आनंद मेळावा जिल्ह्यात प्रथमच आयोजित करण्यात आला. कार्यक्रमासाठी बाल न्याय मंडळ, बाल कल्याण समिती, जिल्हा बाल संरक्षण कक्ष, आशादीप सामाजिक संस्था व लोकमित्र ट्रस्ट प्रतिनिधींनी परिश्रम घेतले.