‘बॉलिवूड घराणा’ची यवतमाळकरांना गुरुवारी मिळणार अनोखी संगीत मेजवानी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 22, 2022 11:51 AM2022-11-22T11:51:28+5:302022-11-22T12:29:02+5:30
संगीतमय स्वरांजली : स्वातंत्र्य संग्राम सेनानी जवाहरलाल दर्डा यांचा २५ वा स्मृतिदिन
यवतमाळ : स्वातंत्र्य संग्राम सेनानी तथा लोकमतचे संस्थापक संपादक जवाहरलाल दर्डा उपाख्य बाबूजी यांचा २५ वा स्मृती समारोह शुक्रवार, २५ नोव्हेंबर रोजी आहे. यानिमित्ताने गुरुवार, २४ नोव्हेंबर रोजी दर्डा उद्यान, प्रेरणास्थळ येथे सायंकाळी ६.३० वाजता अभिजित पोहनकर आणि त्यांचा चमू ‘बॉलिवूड घराणा’ या अनोख्या विशेष मैफलीद्वारे संगीतमय स्वरांजली अर्पण करणार आहेत. यवतमाळकर संगीत रसिकांसाठी हा कार्यक्रम अनोखी मेजवानी ठरणार आहे.
सुप्रसिद्ध संगीत निर्माता, संयोजक, गायक, पियानो वादक अशा अनेक गोष्टींमुळे अभिजित पोहनकर आणि त्यांच्या चमूने संगीत क्षेत्रात स्वत:चे वेगळे स्थान निर्माण केले आहे. ज्येष्ठ शास्त्रीय गायक अजय पोहनकर यांचे सुपुत्र असलेल्या पोहनकर यांच्या रक्तातच संगीत आहे. अभिजित यांनीही संगीत क्षेत्राला नवी संकल्पना दिली. लोकप्रिय बॉलिवूड संगीताला शास्त्रीय संगीताची सुरेख आणि सुरेल जोड देत संगीत रसिकांना भावणाऱ्या एका वेगळ्या संगीताचा बाज त्यांनी निर्माण केला. बॉलिवूड गीतांना नव्या आणि जुन्या बंदिशीमध्ये बांधून फ्यूजन तयार केले. हे संगीत आता जुन्या पिढीसह नव्या पिढीलाही मंत्रमुग्ध करीत आहे.
लोकप्रिय बॉलिवूड संगीतासह शास्त्रीय संगीताचे परिपूर्ण मिश्रण म्हणजे बॉलिवूड फ्यूजन हा अलीकडच्या काळातील संगीत क्षेत्रात चमत्कार मानला जातो. ज्यांना शास्त्रीय संगीत ऐकणे विशेष आवडत नाही, त्यांनाही या बॉलिवूड घराण्याच्या फ्यूजनने संगीताकडे आकर्षित केले आहे. हीच या फ्यूजनची कमाल आहे. या फ्यूजनची संपूर्ण संकल्पना संगीत मास्टर अभिजित पोहनकर यांची असून तेच या संगीत बँडचे संयोजक आहेत.
विदेशात ४५ हून अधिक कार्यक्रमांचे सादरीकरण
२५ वर्षांची संगीतमय कारकीर्द असणाऱ्या अभिजित पोहनकर यांच्या या बॉलिवूड घराणाच्या फ्यूजनचे आजवर विविध देशांत ४५ हून अधिक कार्यक्रम केले आहेत. २००२ साली प्रसिद्ध झालेला पिया बावरी हा संगीत अल्बम आणि सुप्रसिद्ध गायक हरिहरन, ज्येष्ठ गझलगायक गुलाम अली, गायक रूपकुमार राठोड यासारख्या दिग्गज कलाकारांनी तयार केलेली गाणे प्रचंड गाजली असून या गाण्यांना यूट्यूबवर लाखो हिटस् आहेत. २०१९ साली उदयास आलेल्या बॉलिवूड घराणा या फ्यूजन बँडने जगभरात ख्याती मिळविली असून अतिशय नावाजलेले आणि उत्कृष्ट कलाकार या बँडचे मुख्य आकर्षण आहे. नागपूर येथील प्रसिद्ध कलाकार गंधार देशपांडे, सारेगम या लोकप्रिय कार्यक्रमाच्या परीक्षक गायिका भव्या पंडित यांच्यासह इतर नामवंत कलाकार पोहनकर यांच्या या चमूमध्ये आहेत.