शिकाऱ्याच्या तावडीतून सुटलेल्या रानडुकराचा गावात हैदोस; महिला जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 1, 2022 05:41 PM2022-04-01T17:41:24+5:302022-04-01T18:29:40+5:30

चवताळलेल्या या डुकराने थेट गावात धडक दिले. दिसेल त्याच्यावर तो हल्ला करीत एका घरात शिरला. तेथे महिलेला गंभीर जखमी केले. प्रसंगावधान राखत पती धावून आल्याने महिलेचा जीव वाचला.

a woman got injured in wild boar attack | शिकाऱ्याच्या तावडीतून सुटलेल्या रानडुकराचा गावात हैदोस; महिला जखमी

शिकाऱ्याच्या तावडीतून सुटलेल्या रानडुकराचा गावात हैदोस; महिला जखमी

Next
ठळक मुद्देनेर तालुक्यातील पाथ्रडगोळेची घटना

यवतमाळ : उन्हाळ्यात जंगल विरळ झाल्यानंतर शिकारीचा खेळ चालतो. नेर तालुक्यातील पाथ्रडगोळे शिवारात सकाळी शिकाऱ्यांच्या जाळ्यातून रानडुक्कर निसटला. चवताळलेल्या या डुकराने थेट गावात धडक दिले. दिसेल त्याच्यावर तो हल्ला करीत एका घरात शिरला. तेथे महिलेला गंभीर जखमी केले. प्रसंगावधान राखत पती धावून आल्याने महिलेचा जीव वाचला. हा थरार शुक्रवारी सकाळी १०.३० वाजच्या सुमारास घडला.

विद्या गजानन सारवे (४०) असे जखमी महिलेचे नाव आहे. त्या घरात मुलीसह कामात व्यस्त होत्या. अचानक भलामोठा रानडुक्कर चवताळून घरात शिरला. त्याने विद्या सारवे यांच्या हाताला कडाडून चावा घेतला. आरडाओरडा ऐकून बाजूच्या खोलीत असलेले पती मदतीला धावून आले. गलका केल्याने डुक्कर तेथून बाहेर पडला. रस्त्याने त्याने अनेकांना धडक दिली. त्यात दोन जण जखमी झाले आहे. विद्या सारवे यांची प्रकृती खालावली. त्या अचानक झालेल्या हल्ल्याने बेशुद्ध पडल्या. तातडीने त्यांना उपचारासाठी नेर शासकीय रुग्णालय व तेथून यवतमाळ येथील शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले.

राजरोसपणे शिकारीचा खेळ

हरण, रोही, रानडुक्कर, ससा या वन्यप्राण्यांची शिकार राजरोसपणे केली जाते. याच्या मांसाची विक्री मोठ्या प्रमाणात होते. उन्ह्यात हा व्यवसाय ग्रामीण भागांमध्ये मोठ्या प्रमाणात केला जातो. शहरी भागातही मांस विक्रीला आणले जाते. वन विभागाची यंत्रणा मात्र योजनेतील टक्केवारीचे गणित जुळविण्यातच व्यस्त असते. त्यांच्याकडून अशा शिकाऱ्यांविरुद्ध आतापर्यंत तरी ठोस कारवाई झालेली नाही.

पाणी नसल्याने वन्यजीवांची गावाकडे धाव

जंगलात आता पाणीच उपलब्ध नाही. त्यामुळे वन्यजीवांना शेतशिवार किंवा गावाकडे धाव घ्यावी लागते. जंगलाबाहेर पडलेले हे जीव सहज शिकारी टिपतात. यातून हिंस्र घटनाही घडतात. सामान्य नागरिकांना संतापलेल्या वन्यजीवांपासून धोका निर्माण होतो. मानव व वन्यजीव संघर्षात ही बाब भर टाकणारी आहे. त्यामुळे पूर्वीच जंगलातील पाणवठ्यांचे नियोजन करणे अपेक्षित असते. त्यासाठी वन विभागाकडे विशेष आर्थिक तरतूदही केली जाते. मात्र, बरेचदा नियोजनाच्या अर्धे काम करून पूर्ण रक्कम वसूल केली जाते.

Web Title: a woman got injured in wild boar attack

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.