घरकुलासाठी महिलेचा आत्मदहनाचा प्रयत्न; स्वातंत्र्य दिनीच जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात घडला प्रकार
By रूपेश उत्तरवार | Published: August 16, 2022 05:40 PM2022-08-16T17:40:57+5:302022-08-16T17:41:58+5:30
या महिलेचे घरकूल का रखडले याबाबत आता जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी चौकशीचे आदेश दिले असून, याबाबत दोन दिवसांत अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
यवतमाळ : घरकुलासाठी प्रशासनाकडे वारंवार पाठपुरावा करूनही दुर्लक्ष केले जात असल्याने संतापलेल्या महिलेने १५ ऑगस्ट रोजी स्वातंत्र्य दिनी जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात येऊन आत्मदहनाचा प्रयत्न केला. शहर पोलिसांच्या सतर्कतेमुळे पुढील अनर्थ टळला. या महिलेचे घरकूल का रखडले याबाबत आता जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी चौकशीचे आदेश दिले असून, याबाबत दोन दिवसांत अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
यवतमाळ तालुक्यातील वाई येथील सुमित्राबाई शंकर बनसोड यांनी घरकूल योजनेची चौकशी करून न्याय देण्याची मागणी काही दिवसांपूर्वी केली होती. सन २०१२ पासून माझ्यासह चार लाभार्थी प्रतीक्षा यादीत आहेत. दहा वर्ष उलटली तरी ही प्रतीक्षा यादी जैसे थे आहे. दुसरीकडे घराअभावी आमची राहण्याची आबाळ होत असून घराची मातीची भिंतही पडल्याने आम्ही रस्त्यावर आलो आहोत. ग्रामपंचायतीला लागलेल्या यादीत बदल करून प्रत्येकी २० हजार रुपये घेऊन शेती असलेल्या अनेक श्रीमंतांना योजनेतून घरे मिळाली आहे. मग आमच्यावरच अन्याय का? असा प्रश्न सुमित्राबाई यांनी निवेदनाद्वारे जिल्हाधिकाऱ्यांना केला होता.
ग्रामपंचायतीच्या गलिच्छ राजकारणामुळे घरापासून वंचित ठेवल्याचे सांगत मागील चार वर्षांपासून बीपीएलमध्ये असतानाही रेशन मिळाले नसल्याचे त्यांनी म्हटले होते. ग्रामपंचायत कर्मचारी असलेल्या काहींना एकाच घरात तिघांना लाभ मिळतो, आम्ही खरे लाभार्थी असतानाही २०१२ पासून योजनेची प्रतीक्षा करावी लागते. अनेक वेळा पाठपुरावा करूनही घरकूल दिले जात नसल्याने नाईलाजाने आत्मदहनाचा निर्णय घेतल्याचे बनसोड यांनी या पत्रात म्हटले होते. दरम्यान, १५ ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात स्वातंत्र्य दिनाची तयारी सुरू असतानाच सुमित्राबाई बनसोड यांनी हातात पेट्रोलचा कॅन घेऊन जिल्हाधिकारी कार्यालय गाठले. मात्र पोलिसांच्या ही बाब लक्षात येताच त्यांना ताब्यात घेऊन सुमित्राबाई यांना शहर पोलीस ठाण्यात आणण्यात आले. या घटनेमुळे जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात काहीवेळ गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली होती.
या संपूर्ण प्रकरणात शहानिशा करून अहवाल सादर करण्याचे आदेश गटविकास अधिकाऱ्यांना देण्यात आले आहे. यापूर्वी या महिलेचे नाव यादीत दुसऱ्या क्रमांकावर होते. राज्य शासनाच्या सुधारित आदेशानंतर काही फेरबदल झाले. यानंतर त्यांचे नाव कुठल्या क्रमांकावर गेले हे समजले नाही. दोन दिवसात अहवाल प्राप्त झाल्यानंतर घरकुलाबाबत योग्य ती कार्यवाही करण्यात येईल, असे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीकृष्णनाथ पांचाळ यांनी म्हटले आहे.