धक्कादायक! मातेने औषधातून चिमुकलीवर केला विषप्रयोग; 'या' कारणातून महिलेचे टोकाचे पाऊल
By सुरेंद्र राऊत | Published: December 19, 2022 05:39 PM2022-12-19T17:39:10+5:302022-12-19T17:44:38+5:30
वर्षभरानंतर खुनाचा गुन्हा दाखल
यवतमाळ : तीन वर्षापूर्वी पतीचे निधन झाले. त्यानंतर पाच वर्षाच्या चिमुकलीसह सासरी राहणाऱ्या महिलेने अचानक टोकाचा निर्णय घेतला. तिने स्वत:च्या मुलीला खोकल्याच्या औषधात विष दिले. नंतर स्वत:ही विषाचा घोट घेतला. यात चिमुकलीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला तर ती महिला उपचारातून पूर्णत: बरी झाली. हा प्रकार नोव्हेंबर २०२१ मध्ये आर्णी तालुक्यातील खंडाळा येथे घडला. सुरुवातीला पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद करून तपास केला. मात्र फॉरेन्सीक अहवाल येताच महिलेवर मुलीच्या खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ऐश्वर्या संतोष जाधव (५) रा. खंडाळा असे मृत मुलीचे नाव आहे. तिची आई पूजा संतोष जाधव (२८) रा. खंडाळा ता. आर्णी हिने मुलीवर विष प्रयोग करून हत्या केल्याचा आरोप आहे. पूजा जाधव यांचा पती संतोष जाधव याने २०१८ मध्ये विष प्राशन करून आत्महत्या केली. उमरखेड तालुक्यातील माहेर असलेली पूजा पतीच्या निधनानंतरही सासरी राहत होती. तिला दीर, सासू-सासरे असा परिवार आहे. पतीच्या निधनानंतर पूजा पाच वर्षाच्या ऐश्वर्याला घेवून कुटुंबासोबत रमली होती. मात्र नोव्हेंबर २०२१ मध्ये पूजाने स्वत:च्या खोलीत कोंडून घेत मुलीला खोकल्याच्या औषधातून विष दिले व स्वत:ही विष प्राशन केले. हा प्रकार कुटुंबाच्या लक्षात येताच त्यांनी दोघींना यवतमाळच्या खासगी रुग्णालयात दाखल केले. तेथे उपचारादरम्यान ऐश्वर्याचा मृत्यू झाला. तर दीर्घ उपचारानंतर पूजा यातून बचावली.
या प्रकरणी आर्णी पोलिसांनी सुरुवातीला अकस्मात मृत्यूची नोंद घेतली. त्यावेळी पोलिसांना व्हिसेरा तपासणी अहवाल आणि मृत्यूचे कारण कळू शकले नाही. यामुळे हा गुन्हा तपासात होता. अखेर ७ नोव्हेंबर २०२२ ला फॉरेन्सीक अहवाल प्राप्त झाला. त्यामध्ये विषप्रयोगाने ऐश्वर्याचा मृत्यू झाला, हे पुढे आले. यावरून पोलीस निरीक्षक पितांबर जाधव यांच्या तक्रारीवरून पूजा संतोष जाधव यांच्याविरोधात कलम ३०२ व ३०९ भादंविनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस या गुन्ह्याचा आता तपास करीत आहे.
पूजाने आत्महत्येचा प्रयत्न का केला ?
पतीच्या निधनानंतर तीन वर्ष सर्व सुरळीत असताना पूजाने स्वत:सह मुलीला संपविण्याचा प्रयत्न का केला, याचा शोध पोलीस घेत आहे. हा निर्णय घेण्यामागे कुठले कारण आहे, याला कोण जबाबदार, इतर कुणाचा या घटनाक्रमात समावेश आहे का, याचाही शोध आर्णी पोलिसांकडून घेतला जाणार आहे, असे तपास अधिकारी आर्णी ठाणेदार पितांबर जाधव यांनी सांगितले.