जगातील टॉप टेन शास्त्रज्ञांमध्ये यवतमाळच्या तरुणाने पटकावले स्थान, 'काळ्या सोन्या'चा लावला शोध

By अविनाश साबापुरे | Published: August 20, 2023 05:55 PM2023-08-20T17:55:01+5:302023-08-20T17:55:29+5:30

मांगलीच्या जिल्हा परिषद शाळेत शिकून जगाला नवे संशोधन देणाऱ्या या तरुण शास्त्रज्ञाचा समावेश आता जगातल्या दहा सर्वोत्तम संशोधकांमध्ये झाला आहे.

A young man from Yavatmal Dr Vivek Polshettiwar has won a place among the top ten scientists in the world, discovered 'black gold' | जगातील टॉप टेन शास्त्रज्ञांमध्ये यवतमाळच्या तरुणाने पटकावले स्थान, 'काळ्या सोन्या'चा लावला शोध

जगातील टॉप टेन शास्त्रज्ञांमध्ये यवतमाळच्या तरुणाने पटकावले स्थान, 'काळ्या सोन्या'चा लावला शोध

googlenewsNext

यवतमाळ : वातावरणात प्रदूषण वाढविणारा कार्बन डायऑक्साईड शोषून घ्यायचा, तो सोन्याच्या अतिसूक्ष्म कणात साठवायचा, त्यातून ‘काळे सोने’ मिळवायचे आणि त्यातून हरित इंधन तयार करायचे... असे लोकोपयोगी संशोधन करणाऱ्या शास्त्रज्ञाचा जगातील टाॅप टेन शास्त्रज्ञांमध्ये समावेश झाला आहे. कोण आहेत हे शास्त्रज्ञ? त्यांचे नाव आहे डाॅ. विवेक पोलशेट्टीवार आणि ते आलेत झरी तालुक्यातील मांगली नावाच्या छोट्याशा खेड्यातून..! 

मांगलीच्या जिल्हा परिषद शाळेत शिकून जगाला नवे संशोधन देणाऱ्या या तरुण शास्त्रज्ञाचा समावेश आता जगातल्या दहा सर्वोत्तम संशोधकांमध्ये झाला आहे. जर्मनीतील ‘फॉलिंग वॉल्स’ या अत्यंत प्रतिष्ठित वैज्ञानिकांच्या सोसायटीतर्फे दरवर्षी जगभरातील तरुण संशोधकांतून उत्कृष्ट शास्त्रज्ञांची निवड केली जाते. त्यात यंदा हजार शास्त्रज्ञांमधून डॉ. विवेक पोलशेट्टीवार यांच्यासह अन्य नऊ शास्त्रज्ञांची निवड करण्यात आली. त्यांना नोव्हेंबरमध्ये बर्लीन येथे ‘फॉलिंग वॉल्स’ पुरस्काराने त्यांना हार्वर्ड, येल, आयबीएम, ईटीएच, एमआयटी आणि मॅक्स प्लँक येथील नामांकित शास्त्रज्ञांसह सन्मानित केले जाणार आहे. 

विवेक पोलशेट्टीवार हे झरी तालुक्यातील मांगली या गावचे रहिवासी आहेत. त्यांनी सातवीपर्यंतचे शिक्षण गावातच जिल्हा परिषद शाळेत घेतल्यानंतर वणीत बीएसस्सी आणि अमरावतीमध्ये एमएसस्सी केले. ग्वाल्हेरमध्ये पीएचडी केली. त्यानंतर फ्रान्स, अमेरिकेत सखोल संशोधनाचे काम केल्यावर परदेशी नोकरीच्या अनेक संधी खुणावत असताना त्यांनी देशातच सेवा देण्याचा निश्चय केला आणि मुंबई येथे टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्चमध्ये ग्रीन केमेस्ट्री या क्षेत्रात मुलभूत संशोधनावर काम करीत आहेत. 

असे आहे संशोधन 
नॅनो टेक्नॉलॉजी वापरून विवेक पोलशेट्टीवार यांनी सोन्याच्या नॅनो कणांमधील आकार आणि अंतर बदलून पिवळ्या सोन्याचे काळ्या सोन्यात रूपांतर केले. एखादे झाड ज्याप्रमाणे वातावरणातील कार्बन डायऑक्साईड शोषून घेते, त्याच प्रमाणे हे काळे सोनेही कार्बन डायऑक्साइड शोषून घेते. या काळ्या सोन्याच्या आधारे कार्बनडाय डायऑक्साईड, सूर्यप्रकाश आणि पाण्यातील हायड्रोजन एकत्र साठवून त्यांच्यावर प्रक्रिया करून त्यातून मिथेनसारखे इंधन तयार केले जात आहे. प्रदूषण टाळणारे इंधन उत्पादित करणारे कृत्रिम झाड म्हणून या ब्लॅक गोल्डचा पुढील काळात वापर होणार आहे. पोलशेट्टीवार आता या तंत्रज्ञानाचे व्यावसायिकीकरण करण्याचा प्रयत्न करत आहेत.

कार्बन डायऑक्साइडचे संग्रहण आणि पाण्यातील ऑक्सीजनपासून हायड्रोजन वेगळा करणे कठीण काम होते. तर सौरउर्जा साठविणे महाकठीण काम होते. ही प्रक्रिया म्हणजे एक प्रकारचे कृत्रिम प्रकाश संश्लेषणच. पण आम्ही तयार केलेल्या ब्लॅक गोल्डमुळे ही प्रक्रिया शक्य झाली. आता त्यातून हरित इंधन तयार होणे शक्य आहे. लॅबमध्ये हा प्रयोग यशस्वी झालाय. आता त्याचे व्यावसायिक पातळीवर उत्पादन करण्याचा आमचा प्रयत्न आहे.
- डॉ. विवेक पोलशेट्टीवार, संशोधक
 

Web Title: A young man from Yavatmal Dr Vivek Polshettiwar has won a place among the top ten scientists in the world, discovered 'black gold'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.