गुंज येथे नाल्याला आलेल्या पुरातून तरुण वाहून गेला
By सुरेंद्र राऊत | Published: July 4, 2023 10:20 PM2023-07-04T22:20:54+5:302023-07-04T22:21:20+5:30
शिवम रावते वय २५ वर्ष राहणार गुंज असे पुरात वाहून गेलेल्या तरुणाचे नाव आहे.
महागावर/ यवतमाळ : तालुक्यात मंगळवारी दुपारी आलेल्या प्रचंड पावसामुळे महागाव तालुक्यातील गुंज येथे गावाशेजारी असलेल्या नाल्याला आलेल्या पुरातून गावातील दोन तरुण वाहून गेले होते. त्यापैकी एक मिळून आला एकाचा अध्यापही शोध सुरू आहे.
शिवम रावते वय २५ वर्ष राहणार गुंज असे पुरात वाहून गेलेल्या तरुणाचे नाव आहे. तर अमोल चव्हाण वय २६ वर्ष हा तरुण कसाबसा पुरातून बाहेर निघाला आहे. दोघेही एकमेकांच्या हाताला धरून नाल्यातील पुरातून गावाकडे जाण्यासाठी रस्ता पार करत होते. तेवढ्यातच पावसाचा जोर वाढल्यामुळे दोघांचे हात सुटले एक वाहून गेला आणि एक बाहेर निघाला आहे.
ही घटना रात्री साडेसात वाजताच्या दरम्यान उघडकीला आली आहे. सायंकाळी महागाव तालुक्यात पावसाचा प्रचंड जोर वाढलेला आहे. विद्युत पुरवठा खंडित झाला असल्यामुळे तरुणाच्या शोध कार्यामध्ये अडथळा येऊ लागला आहे. गुंज येथील प्रतिष्ठित नागरिक प्रमोद जाधव व अनेक तरुणांनी वाहून गेलेल्या मुलाचा शोध सुरू केलेला आहे.
महागाव तालुक्यात सायंकाळपासूनच धो धो पावसाला सुरुवात झाली. गुंज येथील घटनेबाबत तालुका प्रशासन बरेच गाफील असल्याचे निदर्शनास आले आहे. येथील तहसीलदार संजीवनी मुपडे आणि उपविभागीय अधिकारी एकनाथ काळबांडे यांना भ्रमणध्वनीवर संपर्क केला असता दोघांनीही उत्तर दिलेले नाही. घटनेची माहिती जिल्हाधिकारी यांना देण्यात आली असून रेस्क्यू टीम पाठवणार असल्याचे सांगण्यात आले आहे.