बारा लाख विद्यार्थ्यांचे आधार फेल; गणवेश, पोषण आहाराच्या निधीला कात्री लागणार?
By अविनाश साबापुरे | Published: March 31, 2024 06:09 PM2024-03-31T18:09:03+5:302024-03-31T18:09:21+5:30
पाच लाख विद्यार्थ्यांचे आधारच नाही.
यवतमाळ : राज्यातील २ कोटी १२ लाख ५५ हजार ३५ शालेय विद्यार्थ्यांना विविध योजनांचा लाभ देण्यासाठी आवश्यक असलेल्या आधार व्हॅलिडेशनसाठी ३० मार्च ही अंतिम मुदत देण्यात आली होती. प्रत्यक्षात १ कोटी ९४ लाख ६९ हजार २१५ विद्यार्थ्यांचेच आधार वैध ठरले आहे. तर १२ लाख ३६ हजार ४८४ विद्यार्थ्यांचे आधार इनव्हॅलिड झाले आहे. गंभीर म्हणजे, पाच लाख १७ हजार २३२ विद्यार्थ्यांनी अद्याप आधार क्रमांकच शिक्षण विभागाला उपलब्ध करून दिला नाही. त्यामुळे नव्या सत्रातील गणवेशासह शालेय पोषण आहाराच्या निधीला कात्री लागण्याची भीती आहे.
सन २०२३-२४ या शैक्षणिक सत्राची किमान ९५ टक्के विद्यार्थ्यांच्या आधारची वैधता ३० मार्चपर्यंत यूडायसवर पूर्ण करण्याच्या सूचना प्राथमिक शिक्षण परिषदेने दिल्या होत्या. त्यात यवतमाळसह केवळ १२ जिल्ह्यांनी बाजी मारली. तर उर्वरित जिल्ह्यांना आता मोठ्या अडचणींचा सामना करावा लागणार आहे. परंतु, विद्यार्थ्यांचे आधार क्रमांक पुरविल्यानंतर ज्यांचे व्हॅलिडेशन प्रलंबित आहे, अशा विद्यार्थ्यांची संख्याही ३२ हजार ९५ इतकी प्रचंड आहे. त्यामुळे लवकरच जे जिल्हे ९५ टक्के कामगिरीच्या आसपास पोहोचले आहेत, ते हा टप्पा ओलांडणार आहेत. परंतु, त्यांच्यासाठी मुदतवाढ मिळते की नाही, हा प्रश्न अधांतरी आहे.
आधार इनव्हॅलिड ठरलेले विद्यार्थी
जिल्हा : आधार फेल
सिंधुदुर्ग : ६२२
कोल्हापूर : ७९५९
गडचिरोली : ३१४९
सांगली : ६९५१
भंडारा : ६७५८
गोंदिया : ६९७०
रत्नागिरी : ७४५७
अहमदनगर : २५०६३
चंद्रपूर : १२०९२
बुलडाणा : १६४९३
यवतमाळ : १३५४०
सातारा : १६४९९
परभणी : ११३९७
हिंगोली : ७०६०
अमरावती : १५०४७
वर्धा : १०४८३
लातूर : १७७९५
पुणे : ६५९९५
वाशिम : ९४६५
नाशिक : ५५०१७
जळगाव : ३९५८६
अकोला : १५३३३
नागपूर : ४७४९३
धाराशिव : १८०६१
धुळे : २८१२९
सोलापूर : ५८८०३
नंदूरबार : २१७७४
बीड : ३९९८५
जालना : ३०८४८
नांदेड : ५३७५३
रायगड : ४०९७१
मुंबई : १०३७५४
मुंबई उपनगर : ३८०९१
छत्रपती संभाजीनगर : ९५५३२
ठाणे : १८५२४०
पालघर : १०३३१९
एकूण : १२,३६,४८४
बारा जिल्ह्यांना आले अभिनंदनाचे पत्र
विद्यार्थी आधार क्रमांकाचे ९५ टक्केपेक्षा अधिक काम मुदतीत पूर्ण करणाऱ्या जिल्ह्यांना महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेने अभिनंदन पत्र पाठविले आहे. यवतमाळ (९५.२५), सिंधुदुर्ग (९९.२४), कोल्हापूर (९७.८९), गडचिरोली (९७.४०), सांगली (९७.२९), भंडारा (९६.४७), गोंदिया (९६.३५), रत्नागिरी (९६.३१), अहमदनगर (९६.२५), चंद्रपूर (९५.६६), बुलडाणा (९५.२७) आणि सातारा (९५.२३) या १२ जिल्हा परिषदांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांसह, शिक्षणाधिकारी, संगणक प्रोग्रामर, गटशिक्षणाधिकारी, एमआयएस काॅर्डिनेटर, डाटा एन्ट्री ऑपरेटर व यूडायसचे काम करणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांचे त्यात राज्य प्रकल्प संचालक प्रदीपकुमार डांगे यांनी कौतुक केले आहे.