३२ हजार विद्यार्थ्यांचे आधार अवैध; संचमान्यता वांध्यात येण्याची भीती
By अविनाश साबापुरे | Published: May 5, 2023 05:52 PM2023-05-05T17:52:11+5:302023-05-05T17:53:11+5:30
Yawatmal News विद्यार्थ्यांच्या आधार क्रमांकाचे व्हॅलिडेशन करण्याची प्रक्रिया सध्या शाळांसाठी डोकेदुखी ठरत आहे. जिल्ह्यात तब्बल ३२ हजार १७८ विद्यार्थ्यांचे आधारकार्ड इनव्हॅलिड असल्याची बाब स्टुडंट पोर्टलवरील आकडेवारीवरून पुढे आली आहे.
अविनाश साबापुरे
यवतमाळ : विद्यार्थ्यांच्या आधार क्रमांकाचे व्हॅलिडेशन करण्याची प्रक्रिया सध्या शाळांसाठी डोकेदुखी ठरत आहे. जिल्ह्यात तब्बल ३२ हजार १७८ विद्यार्थ्यांचे आधारकार्ड इनव्हॅलिड असल्याची बाब स्टुडंट पोर्टलवरील आकडेवारीवरून पुढे आली आहे. त्यामुळे संचमान्यतेत अनेक शिक्षक अतिरिक्त ठरण्याची भीती निर्माण झाली आहे.
सन २०२२-२३ या वर्षाची शिक्षक संचमान्यता शाळेतील विद्यार्थिसंख्येच्या आधारावरच निश्चित करण्याची प्रक्रिया सुरू आहे. ज्या विद्यार्थ्यांचे आधारकार्ड स्टुडंट पोर्टलवर यशस्वीरीत्या अपलोड झाले, तेवढीच विद्यार्थिसंख्या संचमान्यतेसाठी गृहीत धरण्याचा शिक्षण विभागाचा नियम आहे. मात्र यंदा त्यापेक्षा कठोर निर्णय घेण्यात आला. अपलोड झालेले आधारकार्डदेखील यूआयडीएआयकडून (भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरण) पडताळून घेतले जात आहे. या पडताळणीत हजारो विद्यार्थ्यांचे आधार क्रमांक इनव्हॅलिड दाखविले जात आहे. तेवढे विद्यार्थी संचमान्यतेसाठी गृहीत धरले जाणार नाहीत. जिल्ह्यात आजघडीला सोळाही तालुक्यांमध्ये इनव्हॅलिड ठरलेल्या विद्यार्थ्यांची संख्या ३२ हजारांवर आहे. त्यांच्या आधारकार्डमधील शाळेच्या रेकाॅर्डप्रमाणे दुरुस्ती करून पुन्हा स्टुडंट पोर्टलवर अपलोड करणे आणि नंतर त्यांचे व्हॅलिडेशन करणे आवश्यक आहे. तर दुसरीकडे आधार व्हॅलिडेशनची वेबसाईट मंदगतीने चालत असल्यामुळे शिक्षकांची डोकेदुखी वाढली आहे.
बीआरसी केंद्रात लावणार आधार मशिन
यवतमाळ पंचायत समितीअंतर्गत सर्वच केंद्रांतील विद्यार्थ्यांच्या आधार कार्डचे व्हॅलिडेशन करण्याबाबत धावपळ सुरू आहे. हे काम तातडीने करता यावे, यासाठी पंचायत समितीमधील बीआरसी केंद्रात सोमवार, ८ मेपासून आधार मशिन लावले जाणार आहे. तेथे विद्यार्थ्यांचे आधार अपडेट, मिसमॅच कार्ड, इनव्हॅलिड विद्यार्थी, आदी कामे केली जाणार आहेत.