नेर येथील अपहृत विद्यार्थिनींना अमरावतीतून घेतले ताब्यात
By admin | Published: February 9, 2017 12:16 AM2017-02-09T00:16:31+5:302017-02-09T00:16:31+5:30
चार दिवसांपासून बेपत्ता असलेल्या येथील तीन अल्पवयीन मुलींसह पाच जणींना नेर पोलिसांनी बुधवारी अमरावती येथून ताब्यात घेतले.
अल्पवयीन मुली : मुंबईची तयारी हुकली
नेर : चार दिवसांपासून बेपत्ता असलेल्या येथील तीन अल्पवयीन मुलींसह पाच जणींना नेर पोलिसांनी बुधवारी अमरावती येथून ताब्यात घेतले. या प्रकरणात पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल केला होता. तक्रार दाखल झाल्यानंतर अवघ्या काही तासात या मुलींचा शोध घेतल्याबद्दल जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राज कुमार यांनी ठाणेदार संजय पुज्जलवार व पथकाचे कौतुक केले.
आपली मुलगी बेपत्ता असल्याची तक्रार तीन पालकांनी नेर पोलिसात केली. एकाचवेळी दाखल झालेल्या तक्रारीमुळे प्रचंड खळबळ निर्माण झाली. पोलिसांनी कुठलाही विलंब न करता शोध सुरू केला. मुलींजवळ असलेल्या मोबाईलचे लोकेशन घेण्यात आले. त्यावेळी ते मुंबई येथे दाखविले जात होते. दरम्यानच मुलींनीही आपल्या कुटुंबातील सदस्यांशी संपर्क करून आपण मुंबईत असून घरी परत येणार नसल्याचे सांगितले जात होते.
याप्रकरणात काहीतरी गोंधळ असल्याचा संशय पोलिसांना होता. त्यांनी लोकेशन घेणे सुरूच ठेवले. अखेर अमरावतीच्या महाजनपुरा भागात त्यांचे लोकेशन दाखविले जात होते. यासाठी नेर पोलिसांनी अमरावतीच्या फ्रेजरपुरा पोलिसांची मदत घेतली. एका रूममधून नेरच्या तीन मुलींसह पाच जणींना ताब्यात घेण्यात आले. ताब्यात घेण्यात आलेल्या नेर येथील मुलींनी सांगितल्यानुसार अमरावती येथे एका कापड दुकानात काम करत असलेल्या मुलीची अमरावती येथे भेट झाली. आपल्याला काम हवे आहे, असे तिला सांगितले. ती आम्हा तिघींनाही स्वत:च्या किरायाने राहात असलेल्या रूमवर घेवून गेली. पालकांकडून अभ्यासासाठी तगादा लावला जात असल्याने घर सोडले. स्वत:च्या पायावर उभे राहायचे आहे. त्यामुळे घरून निघून जाण्याचा निर्णय घेतला, असे या मुलींनी सांगितले. ज्या मुलीच्या आश्रयाला त्या गेल्या होत्या, त्या मुलीसह भातकुली येथील एका मुलीलाही ताब्यात घेण्यात आले आहे. मुलींकडून कुटुंबाला वेळोवेळी दिली जाणारी चुकीची माहिती, कापड दुकानात काम करणाऱ्या मुलीची झालेली भेट आणि तिने दिलेला आश्रय, सर्व मुली अल्पवयीन, या सर्व प्रकाराने विविध शंकांना जन्म दिला आहे. याचा सखोल तपास पोलिसांकडून केला जात आहे. या मुलींना ताब्यात घेण्याची कारवाई ठाणेदार संजय पुज्जलवार यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक माया वैश्य, अजय भुसारी, गुणवंत पाटील यांनी पार पाडली. (तालुका प्रतिनिधी)