मोहुर्लीच्या तलाठ्याचे वणीतून अपहरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 22, 2018 11:33 PM2018-03-22T23:33:20+5:302018-03-22T23:33:20+5:30
शेतीचा ताबा देण्याच्या कारणावरून तालुक्यातील मोहुर्ली येथील तलाठ्याचे अपहरण करण्याची घटना येथील वरोरा मार्गावर बुधवारी रात्री ९ वाजताच्या सुमारास घडली.
ऑनलाईन लोकमत
वणी : शेतीचा ताबा देण्याच्या कारणावरून तालुक्यातील मोहुर्ली येथील तलाठ्याचे अपहरण करण्याची घटना येथील वरोरा मार्गावर बुधवारी रात्री ९ वाजताच्या सुमारास घडली. या प्रकरणाची माहिती होताच पोलिसांनी वाहनाचा पाठलाग करून मोहुर्लीजवळ अपहरणकर्त्यांच्या तावडीतून तलाठ्याची सुटका केली. या प्रकरणी एका विधीसंघर्षग्रस्त बालकासह चौघांना ताब्यात घेण्यात आले.
चैतन्यकुमार शिंगणे असे अपहरण झालेल्या तलाठ्याचे नाव आहे. तर तिरुपती गादावैणी उर्फ अण्णा (४०) रा. मंगलपार्क वणी, भीमराव कालवा (४२) रा. दफाईमांजरी जि. चंद्रपूर, संदीप दोतावार (३५) रा. मंगलपार्क वणी अशी आरोपींची नावे आहेत. मोहुर्लीचे तलाठी चैतन्यकुमार शिंगणे व मंडळ अधिकारी गुलाबराव कुमरे मंगळवारी दुपारी शेख जमीर शेख मेहबूब यांच्या भुदान जमिनीचा ताबा देण्यासाठी गेले होते. त्यानंतर ते वणी येथे परत आले. रात्री ९ वाजताच्या सुमारास भोजन करण्यासाठी वरोरा मार्गावरील खानावळीत पोहोचले. त्या ठिकाणी अण्णा नामक व्यक्ती व इतर साथीदारांनी शेतीच्या ताब्यावरून चैतन्यकुमार शिंगणे यांना धमकावून जबरदस्तीने वाहन बसविले. त्यांचे अपहरण करण्यात आले. काही वेळातच ही माहिती पोलीस निरीक्षक बाबासाहेब खाडे यांना मिळाली. त्यांनी तत्काळ माहिती घेऊन शोध सुरू केला. पांढऱ्या रंगाची टाटा सफारी मोहुर्ली गावाकडे गेल्याचे कळले. मोहुर्ली गावाजवळ सफारी वाहन उभे दिसले. तपासणी केली असता वाहनात तलाठी शिंगणे यांना डांबून ठेवल्याचे दिसून आले. अपहरणकर्त्याच्या तावडीतून तलाठ्याची सुटका करण्यात आली. त्यावेळी तिघांना ताब्यात घेण्यात आले. मात्र आरोपी तिरुपती गादावैणी हा जंगलात पसार झाला. त्याचा शोध घेऊन त्यालाही ताब्यात घेतले. त्यांच्याविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी विजय लगारे यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे, डीबी पथकाचे सुदर्शन वानोळे, सुनील खंडागळे, रत्नपाल मोहाडे, नितीन सलाम, दीपक वांड्रासवार, अमित पोयाम, अजय शेंडे यांनी केली. अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक महादेव पडघान करीत आहे.