कनिष्ठ कर्मचाऱ्याकडे तपास सोपवून दारू तस्करीला ‘अभय’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2021 04:49 AM2021-09-17T04:49:59+5:302021-09-17T04:49:59+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क महागाव : देशी दारू पुरवठ्याचे आयते घबाड महागाव पोलिसांच्या हाती लागले असताना सखोल चौकशी करण्याऐवजी एका ...
लोकमत न्यूज नेटवर्क
महागाव : देशी दारू पुरवठ्याचे आयते घबाड महागाव पोलिसांच्या हाती लागले असताना सखोल चौकशी करण्याऐवजी एका कनिष्ठ कर्मचाऱ्याकडे तपास सोपवून दारू तस्करांना ‘अभय’ दिले जात असल्याची चर्चा सुरू आहे. आर्णी येथील परवानाधारकाने ‘आर्थिक’ बलबुत्यावर पुढील सखोल तपास गुंडाळायला लावल्याचे या व्यवसायातील अनेकजण हॉटेल, पानटपरीवर बोलून दाखवत आहेत.
राज्य उत्पादन शुल्क विभागाने याविषयी कोणत्याही हालचाली केल्या नाहीत. या घटनेकडे केवळ बघ्याची भूमिका त्यांनी घेतली आहे. ७२ पेट्यांमधून ३९ पेट्या देशी दारू अवैधपणे तीन ठिकाणी उतरवल्याची माहिती वाहनचालकाने पोलिसांना दिली. ही दारू नेमकी कुठे उतरविण्यात आली, याचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी आरोपीचा एक दिवसाचा पीसीआर मिळवला होता. मात्र, पोलिसांच्या हाती फार काही माहिती लागली नाही. त्यापूर्वीच परवानाधारकाने चौकशीची दिशा बदलण्यासाठी मोठी ‘डील’ केल्याची चर्चा पोलीस वर्तुळात सुरू आहे.
३९ पेटी देशी दारू कुठे-कुठे उतरवली, याचा शोध घेऊन मूळ परवानाधारकावर कारवाई करता आली असती.
हा तपास किमान सहाय्यक पोलीस निरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्याकडे देणे अपेक्षित होते. मात्र, कनिष्ठ पोलीस कर्मचाऱ्याकडे तपास सोपवून एकप्रकारे आरोपीला अभय दिल्याचे सांगितले जात आहे. तपासाचा अनुभव नसलेल्या ‘त्या’ कर्मचाऱ्याने प्रकरणाच्या मुळाशी न जाता वरवर तपास करून गुंडाळला आहे. ७२ पेटी देशी दारू घेऊन आर्णीवरून पुसदकरिता निघालेले वाहन (एमएच २९, एटी ०९४०) सरळ पुसदला न जाता गुंज, महागाव येथे येऊन नेहमीच्या ग्राहकांकडे ३९ पेट्या दारू उतरवून परतीच्या मार्गावर होते. ते नदीच्या पुलावर अपघातग्रस्त झाले. या अपघातामुळे अवैध देशी दारू वाहतुकीचे बिंग फुटले.
कोट
बिल्टीप्रमाणे कागदपत्रं तपासणीकरिता राज्य उत्पादन शुल्क विभागाकडे पाठवले आहेत. दोन ठिकाणच्या घर झडतीत काहीच सापडले नाही.
- विलास चव्हाण, ठाणेदार, महागाव पोलीस ठाणे