शाळांचे खासगीकरण, कंत्राटी भरती रद्द करा; यवतमाळ, महागावमध्ये रास्ता रोको आंदोलन
By अविनाश साबापुरे | Published: October 2, 2023 04:31 PM2023-10-02T16:31:21+5:302023-10-02T16:31:55+5:30
नागपूर - तुळजापूर राष्ट्रीय महामार्ग दोन तास अडवून धरल्याने वाहतुकीची कोंडी
यवतमाळ :शाळांचे खासगीकरण आणि कंत्राटी पदभरती या निर्णयांविरोधात भारत मुक्ती मोर्चासह विविध संघटनांच्या वतीने सोमवारी राज्यभर आंदोलन करण्यात आले. या महाराष्ट्र बंद आंदोलनाला यवतमाळ शहरासह महागावातही चांगला प्रतिसाद मिळाला. यवतमाळच्या शहरात नारेबाजी करीत रास्तारोको करण्यात आला. तर महागावात नागपूर - तुळजापूर राष्ट्रीय महामार्ग दोन तास अडवून धरल्याने वाहतुकीची कोंडी झाली होती.
राज्य सरकारकडून कमी पटसंख्या असलेल्या जिल्हा परिषद शाळा बंद करण्याचा निर्णय तसेच शासकीय सेवेतील जागा कंत्राटी पद्धतीने भरती करण्याचा निर्णय रद्द करण्यात यावा, अशी मुख्य मागणी यावेळी करण्यात आली. तसेच मराठा ओबीसीची जातनिहाय जनगणना करा, पंढरपूरच्या विठ्ठलाचे मंदिर बडव्यांच्या हातात न देता राज्य सरकारच्या ताब्यात राहावे, महापुरुषांवर भडकावू वक्तव्य करणाऱ्या मनोहर कुलकर्णीला अटक करावी, या मागण्यांसाठी महाराष्ट्रभर आंदोलने करण्यात आली. त्याचे पडसाद जिल्ह्यात उमटले.
भारत मुक्ती मोर्चा, बहुजन क्रांती मोर्चा, राष्ट्रीय पिछडा वर्ग (ओबीसी) मोर्चा, छत्रपती क्रांती सेना, बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्क, लहुजी क्रांती मोर्चा व सत्यशोधक मूलनिवासी वारकरी महासंघ यांच्या संयुक्त विद्यमाने २ ऑक्टोबरला महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली होती.
सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे महाराष्ट्रातील ६२ हजार शासकीय शाळा खाजगी कंपनीला दत्तक देण्याचा निर्णय झाला आहे. एससी, एसटी, ओबीसी. व्हीजेएनटी या सर्व बहुजनांच्या मुलांचे शिक्षण संपुष्टात येण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. तसेच सरकारी आस्थापनेचे खाजगीकरण करून बहुजनांची शिक्षित मुले कंत्राटी पद्धतीने भरण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. हे दोन्ही निर्णय महाराष्ट्रातील बहुजन वर्गाला अती मागासलेल्या परिस्थितीत घेऊन जाणारे आहे, अशी टीका आंदोलकांनी केली. आंदोलनात सारिका भगत, इंदुताई मोहरलीकर, राजू फुलुके, प्रतिभा गुजर, पायल मनवर, सुनीता पोपटकर, चित्रा खरे, नितेश जाधव, राजेश भूजाडे, निलेश मुधाने, विलास भोयर, संदीप मून, प्रमोद जाधव, किशोर नगारे, सलीम शेख, गोविंदराव देशमुख, विनोद बनसोडे, डॉ. संदीप शिंदे, संजय बनसोडे, समाधान पंडागळे, माया पाईकराव आदी उपस्थित होते.