काँग्रेसवर बैठक रद्द करण्याची नामुष्की

By Admin | Published: January 17, 2015 12:11 AM2015-01-17T00:11:39+5:302015-01-17T00:11:39+5:30

चंद्रपूर जिल्हा काँग्रेसच्या बैठकीत पदाधिकाऱ्यांच्या रोषाचा सामना करावा लागला. त्याचीच पुनरावृत्ती यवतमाळच्या बैठकीतही होण्याच्या भीतीने काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांनी ...

The absence of cancellation of the Congress meeting | काँग्रेसवर बैठक रद्द करण्याची नामुष्की

काँग्रेसवर बैठक रद्द करण्याची नामुष्की

googlenewsNext


यवतमाळ : चंद्रपूर जिल्हा काँग्रेसच्या बैठकीत पदाधिकाऱ्यांच्या रोषाचा सामना करावा लागला. त्याचीच पुनरावृत्ती यवतमाळच्या बैठकीतही होण्याच्या भीतीने काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांनी चक्क आपल्या गृहजिल्ह्यातील ही बैठकच रद्द केली.
काँग्रेस पक्षाची सदस्य नोंदणी आणि पक्ष बांधणीच्या दृष्टीने प्रदेशाध्यक्ष आमदार माणिकराव ठाकरे यांनी विदर्भाचा दौरा जाहीर केला होता. त्यानुसार त्यांनी काही जिल्ह्यात पक्ष कार्यकर्त्यांच्या बैठका घेतल्या. १६ जानेवारीला यवतमाळ जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांची बैठक निश्चित करण्यात आली होती. त्या दृष्टीने जिल्हा काँग्रेस कमिटीने तयारीही केली होती. तत्पूर्वी १५ जानेवारीला चंद्रपूर जिल्ह्यातील काँग्रेस पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली. गटबाजीवरून ही बैठक चांगलीच गाजली. प्रदेशाध्यक्षांनी कार्यकर्त्यांची झाडाझडती घेण्याऐवजी खुद्द कार्यकर्तेच प्रदेशाध्यक्षांना धारेवर धरत असल्याचे विसंगत चित्र या बैठकीत पहायला मिळाले. प्रदेशाध्यक्षांनी विधानसभा निवडणुकीत गटबाजीला खतपाणी घातल्याचा, निष्ठावंतांना डावलून अन्य पक्षातील नवख्यांना महत्वाची पदे दिली गेल्याचा आरोप बैठकीत करण्यात आला. महिला पदाधिकाऱ्याने माणिकरावांच्या भाषणात सतत व्यत्यय आणला. चंद्रपूरची ही बैठक सर्वत्र चर्चेचा विषय ठरली. यवतमाळच्या बैठकीतही चंद्रपूरची पुनरावृत्ती होऊ शकते याची जाणीव माणिकरावांना झाली असावी म्हणून त्यांनी आपल्या गृहजिल्ह्यातील शुक्रवारची नियोजित बैठकच रद्द केली. कार्यकर्त्यांना शुक्रवारी सकाळी बैठक रद्दचे संदेश पाठविण्यात आले.
चंद्रपूरच्या घटनेची पुनरावृत्ती करण्याची तयारी काँग्रेसच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी करून ठेवली होती. त्यांना केवळ बैठकीची प्रतीक्षा होती. या बैठकीत प्रदेशाध्यक्षांसह काँग्रेसच्या अन्य नेत्यांनाही धारेवर धरण्याचा सामान्य कार्यकर्त्यांचा मनसुबा होता. मात्र बैठकच रद्द झाल्याने कार्यकर्त्यांची घोर निराशा झाली. कार्यकर्त्यांचा सर्वाधिक रोष हा विधानसभा निवडणुकीत दारव्हा व यवतमाळ मतदारसंघात दिलेल्या काँग्रेस पक्षाच्या उमेदवारीवरून होता. यवतमाळ मतदारसंघात अनेक जुने कार्यकर्ते असताना माणिकरावांनी ऐनवेळी मुलाला रिंगणात उतरविले. तर आपल्या गृहमतदारसंघातून स्वत: अथवा मुलाला लढविण्याऐवजी बंडखोराला उमेदवारी दिल्याने कार्यकर्त्यांमध्ये रोष होता. हाच रोष या नियोजित बैठकीत व्यक्त होणार होता. मात्र त्याच्या भीतीने ही बैठकच रद्द करून प्रदेशाध्यक्षांनी स्वत:च बचाव करून घेतला. त्यामुळे काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्त्यांमध्ये रोष आहे. प्रदेश व जिल्हा कार्यकारिणीतही माणिकरावांनी अनेक केवळ लेटर हेडपुरते दिसणाऱ्या कार्यकर्त्यांना नियुक्ती दिली. त्यांना बैठकांनाही बोलविले जात नाही. हे पदाधिकारीही पक्षाच्या लेटरहेडवरच खूश असल्याचे दिसून येते. (जिल्हा प्रतिनिधी)

Web Title: The absence of cancellation of the Congress meeting

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.