उमरखेड काँग्रेस पदाधिकाऱ्यांत समन्वयाचा अभाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 30, 2019 10:00 PM2019-03-30T22:00:21+5:302019-03-30T22:04:40+5:30
काँग्रेसच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी आत्तापासून पक्षातील निष्ठावंत कार्यकर्ते व मित्र पक्षांच्या पदाधिकाऱ्यांना जाणीवपूर्वक टाळले. त्यांना आघाडीच्या उमेदवारापासून दूर ठेवण्याचे प्रयत्न सुरू असल्याचा आरोप होत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
महागाव : काँग्रेसच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी आत्तापासून पक्षातील निष्ठावंत कार्यकर्ते व मित्र पक्षांच्या पदाधिकाऱ्यांना जाणीवपूर्वक टाळले. त्यांना आघाडीच्या उमेदवारापासून दूर ठेवण्याचे प्रयत्न सुरू असल्याचा आरोप होत आहे.
स्थानिक काँग्रेस कमिटीमधील पदाधिकारी नेहमीप्रमाणे समन्वय ठेवत नसल्याचा पूर्वीचा अनुभव आताही येत आहे. पदाधिकाऱ्यांच्या या वागणुकीमुळे आघाडीच्या उमेदवाराविरुद्ध नाराजी पसरली आहे. आपणच या तालुक्याचे कर्तेधर्ते म्हणून वावरत असलेले हे नेते पक्ष आणि मित्र पक्षांच्या पदाधिकाºयांना विश्वासात घ्यायला तयार नाही, अशी ओरड महागाव तालुक्यात सुरू आहे.
आघाडीच्या उमेदवाराच्या प्रचारार्थ नियोजन करण्यासाठी आयोजित या बैठकीत तोंड बघून कार्यकर्त्यांना निमंत्रण देण्यात आल्याची ओरड आहे. स्थानिक काँग्रेस कमिटीवर आधीच येथील कार्यकर्त्यांचा विश्वास उरला नाही. तालुकाध्यक्ष पुसदवासी झाल्याने त्यांचा जनसंपर्क व राजकारणाची नाळ तालुक्याशी तुटली आहे. पूर्वीचे अनुभव बघता काँग्रेसच्या प्रचाराची धुरा जुन्या माणसांच्या हाती दिल्यास काँग्रेसमधील निष्ठावंत व राष्ट्रवादी तथा मित्र पक्षातील कार्यकर्ते उमेदवारापासून दूरावण्याचा धोका निर्माण झाला आहे.