मदतीच्या बहाण्याने चिमुरडीवर अत्याचार; शाळेत पोहोचविण्याचा बहाणा
By रवींद्र चांदेकर | Published: October 11, 2023 08:36 PM2023-10-11T20:36:34+5:302023-10-11T20:37:38+5:30
पळशी फाट्यावरील घटना, समाजमन सुन्न
रवींद्र चांदेकर, यवतमाळ: उमरखेड येथील एका इंग्रजी माध्यमाच्या खासगी शाळेत जाण्यासाठी तालुक्यातील नवीन पळशी फाट्यावर आलेल्या चिमुरडीला दुचाकीस्वाराने शाळेत सोडण्याचा बहाणा केला. तिला भावासारखा असल्याची बतावणी करीत दुचाकीवर बसविले. नंतर बेलखेड शिवारात नेऊन एका शेतात तिच्यावर अत्याचार केला. ही संतापजनक घटना मंगळवारी सकाळी १०:३० वाजताच्या सुमारास घडली.
इयत्ता पाचवीत शिकणारी ही चिमुरडी केवळ ११ वर्षांची आहे. ती शाळेच्या गणवेशात मंगळवारी सकाळी नवीन पळशी फाट्याजवळ बसची प्रतीक्षा करीत होती. ती ताटकळत बसली होती. तेवढ्यात तिच्याजवळ एक दुचाकीस्वार आला. त्याने तिला आपल्या दुचाकीवर बसायला सांगितले. मात्र, तिने बसण्यास नकार दिला. त्यानंतर त्याने ‘माझी मुलगी तुझ्याच शाळेत शिकते’, असे सांगितले. तरीही ती चिमुरडी त्याच्या दुचाकीवर बसण्यास तयार नव्हती. अखेरीस त्याने ‘मी तुझ्या भावासारखा आहे. तू बस घाबरू नको’, असे म्हणत तिला विश्वासात घेतले. तिला दुचाकीवर बसविले.
त्या नराधमाने तिला दुचाकीवर बसवून बेलखेड परिसरात नेले. तेथे एका शेतात नेऊन तिच्यावर जबरी अत्याचार केला. ही घटना मंगळवारी सकाळी घडली. या घटनेने तालुक्यात खळबळ उडाली आहे. त्या नराधमाने तिला याची वाच्यता केल्यास जिवे मारण्याची धमकी दिली. तिच्या छातीवर मारहाण केली. घटनेनंतर तिला उमरखेड येथील एका मंदिर परिसरात आणून सोडले. तेव्हा चिमुरडी रडत होती. ती कशीबशी शाळेत पोहोचली. मात्र, काही तरी विपरीत घडले, याची शिक्षकांना कल्पना आली. त्यांनी त्वरित तिच्या कुटुंबीयांना माहिती दिली. नंतर लगेचच पोफाळी पोलिसांनाही माहिती देण्यात आली.
आरोपीचा कसून शोध, चिमुरडीवर यवतमाळात उपचार
पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखून तत्काळ यंत्रणा कामाला लावली. अनेक ठिकाणचे सीसीटीव्ही कॅमेरे तपासण्यात आले. आरोपीचा कसून शोध सुरू आहे. मुलीला तपासणी व उपचाराकरिता यवतमाळ येथील वसंतराव नाईक वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले आहे. पोफाळीचे ठाणेदार दीपक ढोमणे पाटील यांनी मुलीच्या बयाणावरून अज्ञात आरोपीविरुद्ध पोक्सोनुसार गुन्हा दाखल केला आहे. घटनेतील स्थळ, रस्त्यांची तपासणी करण्यात आली. अपर पोलिस अधीक्षक पीयूष जगताप यांच्या मार्गदर्शनात एसडीपीओ प्रदीप पाडवी, स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी अत्याचारी नराधमाचा कसून शोध घेत आहेत. मात्र, आरोपी अद्याप पोलिसांच्या हाती सापडला नाही.
गुन्हा अत्यंत संवेदनशील
बुधवारी अपर पाेलिस अधीक्षक पीयूष जगताप यांनी येथील उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालयात शाळकरी मुलीसोबत लैंगिक अत्याचार झाला असून, हा गुन्हा संवेदनशील असल्याचे सांगितले. पोलिस कर्मचाऱ्यांना या गुन्ह्याच्या तपासाच्या अनुषंगाने सूचना दिल्याचे स्पष्ट केले. पोलिस तांत्रिक पुरावे जमा करीत असून, लवकरच या गुन्ह्याचा शोध लावला जाईल, अशी ग्वाही त्यांनी दिली. यावेळी परिवीक्षाधीन पोलिस उपअधीक्षक विनय कोते, एसडीपीओ प्रदीप पाडवी, उमरखेडचे ठाणेदार शंकर पांचाळ, पोफाळीचे ठाणेदार दीपक ढोमणे पाटील उपस्थित होते.