‘मेडिकल’मध्ये स्त्रीराेग विभागाच्या शस्त्रक्रियागृहात एसीचा स्फाेट फाेटाे, नर्सेसची झाली धावपळ
By सुरेंद्र राऊत | Published: April 18, 2024 06:03 PM2024-04-18T18:03:31+5:302024-04-18T18:05:21+5:30
ही घटना गुरुवारी सकाळी १०.३० वाजता घडला. अग्निशमन बंबाला पाचारण करण्यात आले. त्यांनी खिडकीच्या काचा फाेडून आगीवर नियंत्रण मिळवले.
यवतमाळ : येथील वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात फेज तीन इमारतीमध्ये स्त्रियांचे शस्त्रक्रियागृह आहे. येथे सिझर प्रसूती केली जाते. अत्याधुनिक सुविधांसह असलेल्या या शस्त्रक्रियागृहात अचानक एसीचा स्फाेट झाला. उपस्थित डाॅक्टरांनी धाडस दाखवून सिझ फायरचा वापर केला. मात्र प्रचंड धुराचे लाेट उठल्याने तेथून त्यांना बाहेर पडावे लागले. ही घटना गुरुवारी सकाळी १०.३० वाजता घडला. अग्निशमन बंबाला पाचारण करण्यात आले. त्यांनी खिडकीच्या काचा फाेडून आगीवर नियंत्रण मिळवले.
फेस तीन इमारतीमध्ये अत्याधुनिक बालराेग विभाग आणि स्त्रीराेग विभाग आहे. येथील काही महिन्यांपूर्वीच अस्तित्वात आलेल्या शस्त्रक्रियागृहात महिलांची सिझर प्रसूती केली जाते. गुरुवारी सकाळी येथे कर्तव्यावर असलेल्या नर्सेस शस्त्रक्रियागृह परिसरात हाेत्या. अचानक येथील एका एसीमधून धूर निघू लागला. हा प्रकार जवळ असलेल्या निवासी वैद्यकीय अधिकाऱ्याला सांगितला. त्याने तातडीने सिझ फायर उघडून धूर येत असलेल्या एसीच्या दिशेने त्याचा वापर केला. मात्र याचा परिणाम झाला नाही. एसीतून माेठा आवाज आला आणि आगीचे लाेळ उठले. ही माहिती ताेपर्यंत अग्निशमन विभागाला देण्यात आली. पथक येईपर्यंत संपूर्ण शस्त्रक्रियागृहात काळा धूर पसरला हाेता.
काहींनी प्रसंगावधान राखत धूर बाहेर काढण्यासाठी खिडकीच्या काचा फाेडल्या. याच खिडकीतून अग्निशमन पथकाने पाण्याचा फवारा मारला. शस्त्रक्रियागृहातील व्हेन्टीलेटरसह अनेक उपकरणांवर काळी राख जमा झाली हाेती. शस्त्रक्रियागृहासह परिसरात माेठ्या प्रमाणात काेंडलेला धूर बाहेर काढण्यासाठी एक्झाट लावण्यात आले हाेते. मात्र दुपारी १२ वाजतापर्यंत येथे धूर हाेता.
एसीचा स्फाेट झाला तेव्हा सुदैवाने शस्त्रक्रियागृहात काेणीच नव्हते. त्यामुळे माेठा अनर्थ टळला. आता मुख्य शस्त्रक्रियागृहातच महिलांची सिझर प्रसूती केली जाणार आहे. पुढील दहा दिवसात सर्व सुरळीत हाेईल, असे रुग्णालय प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले.