‘एसटी’तील कोरोना बळींसाठी अपघात सहायता निधी खुला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2020 09:14 PM2020-09-22T21:14:52+5:302020-09-22T21:15:15+5:30
‘कोविड-१९’चे बळी ठरलेल्या एसटी कर्मचाऱ्यांसाठी महामंडळाने अपघात सहायता निधी खुला करून दिला आहे. विमा कवच असलेल्या दिवंगत एसटी कर्मचाऱ्यांच्या कुटुंबाला या निधीतून ५० लाख रुपयांचे सानुग्रह सहाय्य दिले जाणार आहे.
विलास गावंडे।
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : ‘कोविड-१९’चे बळी ठरलेल्या एसटी कर्मचाऱ्यांसाठी महामंडळाने अपघात सहायता निधी खुला करून दिला आहे. विमा कवच असलेल्या दिवंगत एसटी कर्मचाऱ्यांच्या कुटुंबाला या निधीतून ५० लाख रुपयांचे सानुग्रह सहाय्य दिले जाणार आहे. आवश्यक त्या सर्व प्रक्रिया पूर्ण करून कुटुुंबाच्या बँक खात्यात ही रक्कम टाकली जाणार आहे.
कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असतानाही लोकवाहिनी लोकांच्या सेवत होती. ही सेवा देताना अनेक कर्मचाऱ्यांना कोरोनाची बाधा झाली. या कर्मचाºयांना विम्याचे कवच पुरविण्यात आले. मृत्यू झाल्यास ५० लाख रुपये सानुग्रह अनुदान जाहीर करण्यात आले. महामंडळातील १४४६ अधिकारी, कर्मचारी कोरोनाग्रस्त झाले. यातील ८९० जण बरे झाले आहे. मात्र उपचार घेत असताना ४४ जणांचा जीव गेला. सद्यस्थितीत ५९२ कर्मचारी कोरोनाग्रस्त आहे. त्यांच्यावर ठिकठिकाणी उपचार केले जात आहे.
दिवंगत कर्मचाºयांना विम्याचे कवच असल्याने त्यांच्या कुटुंबीयांना ठरल्यानुसार ५० लाख रुपयांचे सानुग्रह सहाय्य दिले जाणार आहे. यासाठी लागणाºया रकमेची तरतुदही महामंडळाला करावी लागली. एसटीने प्रवास करणाऱ्या प्रवाशाला दिल्या जाणाऱ्या प्रत्येक तिकीटावर अपघात सहायता निधी कपात केला जातो. या निधीचा उपयोग बस अपघातात ठार झालेल्या लोकांच्या कुटुंबीयांना मदतीसाठी केला जातो. चार वर्षांपासून हा निधी गोळा केला जातो. यातूनच काही रक्कम खर्च झाली आहे. या निधीचे काही महिन्यापर्यंत २०० कोटी महामंडळाकडे जमा होते.
या जमा रकमेतून दिवंगत कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांना ५० लाखांचे सानुग्रह सहाय्य दिले जाणार आहे. एसटी महामंडळाच्या अपघात सहायता निधी विश्वस्त मंडळाने मंजुरी दिली आहे. ५० लाखांची पूर्तता करण्यासाठी लागणारा निधी अपघात सहायता निधी विश्वस्त मंडळाकडून विभागाच्या मागणीनुसार वर्ग करण्याचे अधिकारी अपघात सहायता निधी सदस्य तथा मुख्या लेखा अधिकारी यांना देण्यात आले आहे.
वादविवाद टाळण्यासाठी दक्षता
भविष्यात उद्भवणारे संभाव्य वादविवाद टाळण्याची दक्षताही महामंडळाने घेतली आहे. कर्मचाऱ्यांच्या भविष्य निर्वाह निधी विवरणपत्रात वारस नमूद नसल्यास अर्जदाराकडून तसे प्रमाणपत्र प्राप्त करून घेतले जाणार आहे. एकापेक्षा अधिक वारस असल्यासह आवश्यक ती कार्यवाही पूर्ण केली जाणार आहे.