अपघात एक ठार, पाच गंभीर
By admin | Published: August 1, 2016 12:45 AM2016-08-01T00:45:09+5:302016-08-01T00:45:09+5:30
भरधाव कार रस्त्याच्या कडेला उलटून झालेल्या अपघातात एक तरुण ठार तर पाच जण गंभीर जखमी झाले.
वणीचे तरुण : जोडमोहाजवळील वळणावर कार उलटली
यवतमाळ : भरधाव कार रस्त्याच्या कडेला उलटून झालेल्या अपघातात एक तरुण ठार तर पाच जण गंभीर जखमी झाले. ही घटना यवतमाळ-पांढरकवडा मार्गावरील जोडमोहा गावाजवळ रविवारी सायंकाळी ५.३० वाजताच्या सुमारास घडली. यवतमाळवरून वणी येथील तरुण कारने गावी परत जात असताना हा अपघात घडला.
नकूल अशोक धोबे (२८) रा. शिवणी धोबे ता. मारेगाव असे मृताचे नाव आहे. तर शे.शकील शे.सईद (३४) रा. राजूर कॉलरी ता. वणी, अनिल गुंजेकर (३०), श्रीकांत गोहोकार, चालक सुनील गुंजेकार (३२), प्रवीण पांढरे (३२) सर्व रा. चिखलगाव ता. वणी अशी जखमींची नावे आहे. वणी तालुक्यातील हे तरुण रविवारी सकाळी एम.एच.३४-एए- ५५१३ क्रमांकाच्या स्वीप्ट डिझायर कारने यवतमाळात आले होते. यवतमाळातील काम आटोपून गावी परत जात असताना जोडमोहा जवळील वळणावर चालक सुनील गुंजेकर याचे नियंत्रण गेले. त्यामुळे कार रस्त्याच्या कडेला जाऊन उलटली. त्यामुळे कारमध्ये बसून असलेल्या सर्वांना जबर मार लागला. यात नकूल धोबेसह सहा जण या अपघातात गंभीर जखमी झाले.
अपघात होताच जोडमोहा येथील नागरिकांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. जखमींना बाहेर काढले. दरम्यान वाहतूक शाखेचे सहायक पोलीस उपनिरीक्षक उपाध्ये घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी जखमींना तत्काळ यवतमाळच्या शासकीय रुग्णालयात दाखल केले आहे. जखमींपैकी नकूल धोबे याला मृत घोषित करण्यात आले. इतर जखमींवर यवतमाळच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहे.
या अपघाताची माहिती यवतमाळ ग्रामीण पोलिसांना देण्यात आली. अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक समाधान धंदरे यांच्या मार्गदर्शनाखाली राजू आडे करीत आहे. (कार्यालय प्रतिनिधी)