चंद्रपूरवरून बुलडाणा येथे मजूर घेऊन जाणाऱ्या वाहनाला अपघात; एक ठार, दोन जण गंभीर
By सुरेंद्र राऊत | Published: September 28, 2022 10:28 AM2022-09-28T10:28:32+5:302022-09-28T17:49:07+5:30
चालकाचे नियंत्रण सुटले : बाभूळगाव-कळंब मार्गावरील घटना
बाभूळगाव (यवतमाळ) : अनियंत्रित झालेले वाहन कठडे तोडून पुलावरून कोसळल्याने झालेल्या अपघातात एक ठार, तर २६ जण जखमी झाले. ही घटना बुधवारी सकाळी ७.३० वाजता बाभूळगाव-कळंब मार्गावरील नायगाव येथे घडली. जखमींवर यवतमाळ येथे उपचार केले जात आहे.
चंद्रपूर येथील ३० मजुरांना घेऊन पिकअप व्हॅन बुलडाणा येथे निघाली होती. कळंब मार्गे बाभूळगावकडे येत असताना नायगाव पुलावर पिकअप व्हॅन अनियंत्रित झाली. रस्त्याने चालत निघालेल्या तीन जणांना या व्हॅनने जोरदार धडक दिली. यानंतर हे वाहन ३० मजुरांसह पुलाचा लोखंडी कठडा तोडून खाली कोसळले. यामध्ये एक जण जागीच ठार झाला तर, जखमींपैकी दोघे गंभीर आहेत.
यदु मोतीराम जाधव (५५) नायगाव असे अपघातातमृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. तर, ममता सुभाष मेश्राम, रमेश सखाराम कांबळे (४५) सुवर्णा विनायक लोनबले (34), जोस्ना हेमराज हजारे (३०), ममता सुधाकर मेश्राम (३५), सुषमा दिनेश मेश्राम (३५), शालू गुरुदास जराते (३५), हेमराज मनोहर हजारे (३५), विनायक बापूजी लोनवले (35), डाकराम केवलराम बोरसे (३५), मोरेश्वर कालिदास गेडाम (३५), जयश्री यादव लोनवले (३०), निराशा हेमंत मडावी (३०), अशी जखमींची नावे आहेत.
घटना घडताच नायगाव येथील नागरिक मदतीला धावले. पोलिसांना पाचारण करण्यात आले. ठाणेदार रवींद्र जेधे, सहायक पोलीस निरीक्षक संदीप पाटील, पोलीस उपनिरीक्षक मंगेश डांगे, पोलीस कर्मचारी व होमगार्डचा ताफा घेऊन घटनास्थळी दाखल झाले. मिळेल त्या वाहनाने आणि येथील ग्रामीण रुग्णालयाच्या ॲम्बुलन्सद्वारे सर्व जखमींना यवतमाळ येथे उपचारार्थ हलविण्यात आले आहे.