ईगल कन्स्ट्रक्शनच्या कारभाराने अपघात वाढले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 5, 2019 06:00 AM2019-12-05T06:00:00+5:302019-12-05T06:00:04+5:30
खोदलेल्या रस्त्यावरून सकाळी व सायंकाळी गुराढोरांची गर्दी होते. अशा वेळी वाहने पुढे काढताना चालकांची कसरत होते. अनेकदा यातून गुरांनी दुचाकी वाहनांना रस्त्याच्या खाली खोदलेल्या खड्ड्यात ढकलून देण्याचे प्रकार घडले आहे. गुरे रस्त्याच्या खाली उतरत नाहीत, त्यामुळे वाहतूक मंदावते व त्यातूनच कोंडी होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
पुसद : ११६३ कोटी रुपयांच्या रस्ते बांधकामात ईगल कन्स्ट्रक्शनचे कारनामे वाहतुकीस अडथळा निर्माण करीत असून अपघातही वाढले आहे. परंतु सार्वजनिक बांधकाम विभाग या कंत्राटदारावर मेहेरबान आहे. या कंत्राटदाराला मोठ्या प्रमाणात सूट-सवलत बांधकाम अभियंत्यांकडून दिली जात असल्याची ओरड ऐकायला मिळते.
ठाणे येथील ईगल कन्स्ट्रक्शन कंपनीला ११६३ कोटींच्या रस्त्याचे कंत्राट मिळाले आहे. एक तर आधीच या कंत्राटदाराने काम विलंबाने सुरू केले. त्यातही या कामाची गती प्रचंड मंदावली आहे. हा कंत्राटदार करारातील नियम-अटी पाळताना दिसत नाही. यानंतरही बांधकाम खात्याकडून कंत्राटदारावर ठोस कारवाईची भूमिका घेतली जात नाही. उलट त्याला मोबिलाईज अॅडव्हॉन्स मंजूर करण्याकडे बांधकाम खात्याचा अधिक कल दिसून येतो.
ईगल कन्स्ट्रक्शनने काही लोकल कंत्राटदारांना हाताशी धरुन काम मार्गी लावण्याचा प्रयत्न केला आहे. या मार्गावर १६७ सीडी वर्क (मोठे रपटे) करायचे आहे. परंतु आतापर्यंत केवळ १२ वर्क झाले आहेत. हे काम रेडिमिक्सने करणे बंधनकारक होते. मात्र जागेवरच रेती-गिट्टी, सिमेंट, पाण्याचे टँकर व मशिनरी आणून हे काँक्रीटीकरण केले गेले. विशेष असे बांधकाम खात्यानेही त्यावर आक्षेप घेतला नाही. रस्त्यावर हे साहित्य पडून असल्याने वाहतुकीस अडथळा होत असून अपघातही वाढले आहे. लोकल काँक्रीटीकरणाची बांधकाम खात्याने परवानगी देण्यामागील रहस्य गुलदस्त्यात आहे.
ईगल कन्स्ट्रक्शनने स्थानिक पातळीवर मासिक भाड्याने मशिन्स लावल्या आहेत. त्या माध्यमातून रस्त्याच्या दोन्ही बाजूने १०० मीटरपर्यंत केवळ खोदकाम सुरू आहे. आरसीएम युनिट इन्सटॉलच झाले नसताना रस्त्याचे काँक्रीटीकरण होणार कसे हा प्रश्न आहे.
खोदलेल्या रस्त्यावरून सकाळी व सायंकाळी गुराढोरांची गर्दी होते. अशा वेळी वाहने पुढे काढताना चालकांची कसरत होते. अनेकदा यातून गुरांनी दुचाकी वाहनांना रस्त्याच्या खाली खोदलेल्या खड्ड्यात ढकलून देण्याचे प्रकार घडले आहे. गुरे रस्त्याच्या खाली उतरत नाहीत, त्यामुळे वाहतूक मंदावते व त्यातूनच कोंडी होते.
या खोदलेल्या रस्त्यामुळे अनेक अपघातही घडले आहेत. कन्स्लटंट व बांधकाम अभियंते एवढा गैरप्रकार सुरू असूनही ब्रसुद्धा काढत नाही. असे अपघात झाल्यास जबाबदार कोण असा मुद्दा उपस्थित केला जात आहे.
५८ कोटींच्या तुलनेत काम काहीच नाही
या खोदलेल्या रस्त्यामुळे नागरिकांना मात्र प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. ‘जुनाच रस्ता बरा, आता रस्त्यांचा विकास नको’ असे म्हणण्याची दुदैवी वेळ पुसद-उमरखेड विभागातील नागरिकांवर आली आहे.
सार्वजनिक बांधकाम खात्याने ईगल कन्स्ट्रक्शनची पाठराखण करणे सोडून नागरिकांच्या हिताला अधिक महत्व द्यावे, अशी मागणी नागरिकांमधून पुढे आली आहे. राजकीय स्तरावरूनही ही मागणी योग्य ठरविली जात आहे.
रेडिमिक्सचा दर नऊ हजार रुपये क्युबीक मिटर आहे तर मिक्सर काँक्रीटीकरणाचा दर सहा हजार रुपये क्युबीक मीटर आहे. कंत्राटदाराला या काँक्रीटीकरणात प्रति क्युबीक मीटर तीन हजारांची ‘मार्जीन’ आहे.
कंत्राटदाराला आतापर्यंत ५८ कोटी रुपये दिले गेले, मात्र तेवढे काम झालेले नाही. कंत्राटदाराच्या फायद्याला बांधकाम यंत्रणाही ०.२५ टक्के ‘मार्जीन’साठी हातभार लावत असल्याचे बोलले जाते.
धुंदी घाटातील मशिनरी हुडी रोडवर हलविली
ईगल कन्स्ट्रक्शनला रेडिमिक्स काँक्रीट युनिट (आरसीएम) स्थापन करणे बंधनकारक होते. मात्र अद्यापही हे युनिट कुठेच स्थापन झालेले नाही. सुरुवातीला धुंदी घाटात ईगल कन्स्ट्रक्शनने आपली मशिनरी आणून उभी केली. मात्र किरायावरून वाद झाल्याने आठवडाभरापूर्वीच ही मशिनरी हुडी रोडवर हलविली गेली. दहा महिन्यांपोटी पाच लाख देऊन जुन्या जागेचा हिशेब कंत्राटदाराने चुकता केला, हे विशेष.