यवतमाळमध्ये भीषण अपघात, 8 जणांचा मृत्यू, अनेक जण जखमी
By ऑनलाइन लोकमत | Published: February 16, 2020 08:45 PM2020-02-16T20:45:53+5:302020-02-16T21:47:13+5:30
मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता
कळंब (यवतमाळ) : अस्थी विसर्जन करून परतणारे वाहन दरीत कोसळून आठ जण ठार, तर १६ जण जखमी झाले. ही घटना रविवारी दुपारी ५ वाजताच्या सुमारास कळंब-जोडमोहा मार्गावर असलेल्या वाढोणा गावादरम्यान घडली. मृतांमध्ये चालकासह सहा पुरुष व दोन महिलांचा समावेश आहे.
अमर आत्राम (२७) चालक, महादेव चंदनकर (६२), किसन परसंकर (६०) रा.जोडमोहा, महादेव बावनकर (५३) रा.शेंदूरजना घाट, गणेश चिंचोळकर (५२) रा.महागाव, अंजना वानखडे (६०), सरस्वताबाई दाभेकर (६८) अशी या घटनेतील मृतांची नावे आहेत. एका मृताचे नाव कळू शकले नाही.
जोडमोहा येथील बाबाराव वानखडे (५५) यांच्या अस्थी विसर्जनासाठी कुटुंबातील सदस्य व आप्तेष्ट कोटेश्वर (जि.वर्धा) येथे पीकअप मॅजीक वाहनाने (एम.एच.३१/एफसी-२७७४) गेले होते. हा विधी पूर्ण करून जोडमोहा येथे परतत असताना चालकाचे नियंत्रण सुटल्याने वाहन वाढोणाजवळील दरीत कोसळले.
या घटनेत पाच जण जागीच ठार झाले. दोघांचा रुग्णालयात हलविताना मृत्यू झाला. नरेंद्र वखरकर (४०), सूमन बावने (६५), किरण वानखडे (३२), संतोष मेश्राम (३५), सुमित्रा काळे (६५), शिवम (१४), प्रकाश सोनटक्के, बेबी सोनटक्के (७०), रवी वानखडे (३५), संदीप लोखंडे (२५), पंकज सोनुले (३०), उमेश वेट्टी (३५), पांडुरंग सूर्यवंशी (४९), अंकुश वानखडे (३१), गणेश वानखडे (१८), रामचंद्र बावने (४०) हे जखमी असून त्यांच्यावर यवतमाळ येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचार केले जात आहेत.
अपघाताची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली व जखमींना बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. कळंबचे ठाणेदार विजय राठोड सहका-यांसह घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी वाहनात अडकलेले मृतदेह बाहेर काढून शवचिकित्सेसाठी रवाना केले, तर जखमींना रुग्णालयात हलविले. दरम्यान अपर पोलीस अधीक्षक नुरूल हसन आणि उपविभागीय पोलीस अधिकारी माधुरी बाविस्कर यांनी घटनास्थळाला भेट दिली.
Maharashtra: 7 dead and 15 injured after a vehicle carrying them overturned in Yavatmal. More details awaited. pic.twitter.com/AG17vwAE86
— ANI (@ANI) February 16, 2020