यवतमाळ जिल्ह्यात अपघात; दोन चिमुकल्यांसह आई ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 9, 2018 09:34 PM2018-08-09T21:34:43+5:302018-08-09T21:35:01+5:30
येथून मानोराकडे जाणाऱ्या मार्गावरील पॉवर हाऊसजवळ झालेल्या भीषण अपघातात आईसह दोन चिमुकले जागीच ठार झाले, तर त्यांचे वडील गंभीर जखमी झाले. ही घटना गुरुवारी दुपारी १ वाजताच्या सुमारास घडली.
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : येथून मानोराकडे जाणाऱ्या मार्गावरील पॉवर हाऊसजवळ झालेल्या भीषण अपघातात आईसह दोन चिमुकले जागीच ठार झाले, तर त्यांचे वडील गंभीर जखमी झाले. ही घटना गुरुवारी दुपारी १ वाजताच्या सुमारास घडली.
शीतल शंकर सोंगे (२४), हरिओम शंकर सोंगे (६) आणि सोम शंकर सोंगे (३) अशी अपघातात ठार झालेल्या आई व मुलांची नावे आहे. शंकर पंजाब सोंगे (३३) असे जखमी वडिलांचे नाव आहे.
गुरुवारी दुपारी शंकर सोंगे आपल्या दुचाकीने (क्र.एमएच २९ क्यू १६७९) वाई (गौळ) येथून दिग्रसकडे येत होते. त्यावेळी समोरुन भरधाव वेगाने येणाऱ्या अर्टिगा (क्र. एमएच३९ एल ९२००) या वाहनाने सोंगे यांच्या दुचाकीला जबर धडक दिली. त्यात हरिओम व सोम हे जागीच ठार झाले. आई-वडील गंभीर जखमी झाले. आई शीतलला उपचारासाठी नागपूर येथे नेत असताना कळंबनजीक त्यांचाही मृत्यू झाला.
गंभीर जखमी शंकर सोंगे यांना प्रथम येथील ग्रामीण रुग्णालयात व नंतर यवतमाळच्या शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले. अपघाताची माहिती कळताच ठाणेदार रामकृष्ण महल्ले पोलीस ताफ्यासह घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी पंचनामा केला. तो पर्यंत अर्टिगाचा चालक घटनास्थळावरून पसार झाला होता. अधिक तपास सुरु आहे.