बीएसएफ जवानाचा अपघाती मृत्यू
By admin | Published: December 27, 2015 02:47 AM2015-12-27T02:47:05+5:302015-12-27T02:47:05+5:30
येथील रविनगरातील जवान रवींद्र शंभरकर यांचा २४ डिसेंबरला अपघाती मृत्यू झाला.
शासकीय इतमामात अंत्यसंस्कार : हवेत तीन फैरी झाडून मानवंदना
वणी : येथील रविनगरातील जवान रवींद्र शंभरकर यांचा २४ डिसेंबरला अपघाती मृत्यू झाला. त्यांच्या पार्थिवावर येथील मोक्षधामात शनिवारी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.
रवींद्र शंभरकर हे सीमा सुरक्षा दलात दिल्ली येथे कार्यरत होते. त्यांनी दोन महिन्यांची रजा काढली होती. रजा मंजूर होताच २४ डिसेंबरला ते दिल्ली येथून रेल्वेने वणीकडे निघाले. रेल्वे ग्वाल्हेर येथे पोहोचल्यानंतर ते पाण्याची बॉटल घेण्याकरिता रेल्वे स्थानकावर उतरले. पाणी बॉटल घेत असतानाच रेल्वे सुरू झाल्याने ते धावतच रेल्वेकडे निघाले. मात्र रेल्वेत चढण्याच्या प्रयत्नात ते प्लॅटफॉर्मवर आदळले. यात त्यांचा जागीच मृत्यू झाला.
ही घटना सीमा सुरक्षा दलाला कळताच अधिकारी ग्वाल्हेर येथे पोहोचले. त्यांनी शंभरकर कुटुंबियांना महिती दिली. त्यानंतर सर्व सोपस्कार पार पडल्यानंतर शनिवारी सीमा सुरक्षा दलाच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत त्यांचा मृतदेह वणीत आणण्यात आला.
येथील रविनगरमधून तिरंग्यात गुंडाळलेली त्यांची अंत्ययात्रा निघाली. अंत्ययात्रा मोक्षधामात पोहचल्यानंतर सीमा सुरक्षा दल आणि येथील पोलिसांतर्फे हवेत तीन फैरी झाडून त्यांना मानवंदना देण्यात आली. सहायक पोलीस निरीक्षक विजय कसोधन, दीपक पवार आणि पोलिसांनी त्यांना मानवंदना दिली. (कार्यालय प्रतिनिधी)