खासगी वायरमनचा विद्युत खांबावरच अपघाती मृत्यू; संतप्त जमावाची अभियंत्यास मारहाण
By ऑनलाइन लोकमत | Published: November 18, 2023 01:35 PM2023-11-18T13:35:19+5:302023-11-18T13:35:57+5:30
काळी दौ. येथे बाजारपेठ कडकडीत बंद
महागाव (यवतमाळ) : महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीच्या काळी (दौ.) येथील ३३ केव्ही उपकेंद्रात आउटसोर्सिंगमध्ये काम करणारा खासगी वायरमन विठ्ठल सीताराम आढाव (२७) याचा करंट लागून विद्युत खांबावरच गुरुवारी दुपारी मृत्यू झाला. आढाव तांत्रिक बिघाड दुरुस्त करीत असताना उपकेंद्रातून हलगर्जीपणे वीजपुरवठा सुरू करण्यात आला. त्यामुळे त्याचा मृत्यू झाल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला आहे.
विठ्ठल आढाव याच्या मृत्यूची बातमी कळताच संतप्त जमावाने काळी (दौ.) उपकेंद्राचे कनिष्ठ अभियंता नीलेश काकडे यांना घेराव घातला व चोप दिला. त्यानंतर शुक्रवारी गावकरी व व्यावसायिकांनी घटनेच्या निषेधार्थ बंद पुकारला. त्यामुळे दिवसभर बाजारपेठ कडकडीत बंद होती. आढाव हा काळी दौलत उपकेंद्रात आउटसोर्सिंगमध्ये कंत्राटी वायरमन म्हणून कार्यरत होता. कृषिपंपाच्या फीडरवरील (एजी फीडर) तांत्रिक बिघाड दुरुस्त करण्यासाठी उपकेंद्रातून वीजपुरवठा बंद करून (ब्रेक डाउन) त्याला दुरुस्तीसाठी पाठविण्यात आले.
उपकेंद्रात कनिष्ठ अभियंता नीलेश रामदास काकडे व ऑपरेटर राहुल राऊत होते. वसंतराव नाईक उच्च माध्यमिक विद्यालयाच्या प्रांगणातील विद्युत खांबावर चढून तांत्रिक बिघाड दुरुस्त करीत असताना अचानक वीजपुरवठा सुरू झाला. यात विठ्ठल आढाव हा तारांना चिकटला व मृत पावला. काही क्षणांतच मोठा जमाव घटनास्थळी जमा झाला. कनिष्ठ अभियंता काकडे हेसुद्धा घटनास्थळी रवाना झाले. दरम्यान, अभियंत्याच्या हलगर्जीमुळेच विद्युत पुरवठा सुरू करण्यात आला व यात विठ्ठल आढाव याचा हाकनाक बळी गेला, असा आरोप सुनील टेमकर आणि सय्यद इरफान यांनी केला.
शुक्रवारी मृतदेहाची उत्तरीय तपासणी करुन काळी (दौ.) येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. विठ्ठल आढाव याच्या पश्चात आई-वडील, पत्नी, १ मुलगा, १ मुलगी आणि मोठा आप्त परिवार आहे.
अभियंता व ऑपरेटरविरोधात गुन्हे दाखल
निष्काळजीपणे विद्युत पुरवठा सुरू केल्यामुळेच विद्युत खांबावर तांत्रिक बिघाड दुरुस्त करणारा खासगी वायरमन विठ्ठल आढाव याचा मृत्यू झाल्याची तक्रार मृताचा भाऊ संतोष आढाव यांनी दिली. त्यानंतर पुसद ग्रामीण पोलिस ठाण्यात कनिष्ठ अभियंता नीलेश काकडे आणि ऑपरेटर राहुल राऊत यांच्या विरोधात भादंवि ३०४ आणि ३४ नुसार गुन्हे दाखल करण्यात आले. या प्रकरणाचा तपास ठाणेदार आर. के. राठोड यांच्या मार्गदर्शनात पोलिस उपनिरीक्षक बालाजी शेंगेपल्लू करीत आहेत.