मेडिकल हल्ला प्रकरणातील साक्षीदाराचा अपघाती मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: January 12, 2023 05:37 PM2023-01-12T17:37:01+5:302023-01-12T17:37:29+5:30
घाटंजी मार्गावर अपघात : ५ डिसेंबरच्या रात्री अक्षय टोळीसोबत झाला होता वाद
यवतमाळ : शहरातील दारव्हा मार्गावर ढाब्यावर जेवणावरून वाद झाला. यात मारहाणीत एकजण जखमी झाला. जखमीला घेऊन बाभूळगावचे युवक मेडिकलमध्ये आले. तेथे अक्षय टोळीतील गुंडांनी पुन्हा हल्ला केला. ही घटना ५ डिसेंबर २०२२ च्या रात्री घडली. या घटनेतील साक्षीदार सागर निंबाजी कुलाल (२२, रा. बाभूळगाव) याचा ६ जानेवारीला रात्री घाटंजी मार्गावर पांढुर्णाजवळ अपघात झाला. या अपघातात तो जागीच ठार झाला.
सागर कुलाल हा (एमएच-२९-एए-६६८४) या दुचाकीने यवतमाळकडे येत होता. त्याला समोरून येणाऱ्या गॅसच्या वाहनाने धडक दिली. यात त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. यवतमाळातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू असताना रुग्णालयात त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी घाटंजी पोलिसांनी अपघाताची नोंद घेतली आहे.
महिनाभरापूर्वी शासकीय रुग्णालयात हल्ला झाला तेव्हा गौरव ठाकूर, रोशन जगताप व सागर कुलाल हा आपल्या मित्रांसह शासकीय रुग्णालयात होता. इतकेच नव्हे तर ढाब्यावर वाद झाला तेव्हा सागरनेच अक्षय टोळीतील गुंडांना चोप दिला. यावरून चिडलेल्या अक्षय टोळीने मेडिकलमध्ये काही तासांतच प्रतिहल्ला केला. यातील भगीरा ऊर्फ आशिष रमेश दांडेकर, रघू रोकडे, दिनेश तुरकाने, ब्रॅन्ड ऊर्फ धीरज सुनील मैंद, विशाल वानखडे, स्तवन शहा, लोकेश बोरखडे, वंश राऊत, दिनेश तुरकाने, प्रज्वल मेश्राम यांना अटक केली. या गुन्ह्यात दहा जणांचा सहभाग होता. मात्र, त्यातील दोघे जण पसार आहेत. पसार असलेल्या एकाचा अपघात झाला आहे. त्यामुळे त्याला अटक करण्यात आली नव्हती.
गंभीर गुन्हे करणाऱ्या टोळीशी वाद, त्यानंतर मारहाणीच्या घटनेचा प्रत्यक्ष साक्षीदार असलेल्या सागर कुलाल याच्या अपघाती मृत्यूबाबत संशय व्यक्त होत आहे. सागरच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीवरून घाटंजी पोलिसांनी सागर विरोधातच निष्काळजीपणे वाहन चालविल्याचा गुन्हा दाखल केला आहे.