राष्ट्रीय महामार्गावर अपघाताचे सत्र

By admin | Published: September 21, 2015 02:18 AM2015-09-21T02:18:33+5:302015-09-21T02:18:33+5:30

नागपूर-हैदराबाद या राष्ट्रीय महामार्ग क्र.७ वर अपघाताची मालिका सुरू झाली आहे. खड्ड्यात रस्ता अशी या मार्गाची परिस्थिती आहे.

Accidental Session on National Highway | राष्ट्रीय महामार्गावर अपघाताचे सत्र

राष्ट्रीय महामार्गावर अपघाताचे सत्र

Next

खड्ड्यांचा पसारा : पाच किलो मीटरसाठी लागतो एक तास
किन्ही(जवादे) : नागपूर-हैदराबाद या राष्ट्रीय महामार्ग क्र.७ वर अपघाताची मालिका सुरू झाली आहे. खड्ड्यात रस्ता अशी या मार्गाची परिस्थिती आहे. केवळ पाच किलोमीटर अंतर पार करण्यासाठी जवळपास एक तास एवढा वेळ लागतो. गेली दोन दिवसांपासून तर या मार्गावरील वाहतूक कमालीची विस्कळीत झाली आहे. अनेक ठिकाणी फसलेल्या वाहनांमुळे इतर वाहनांना मार्ग काढण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागत आहे.
कारेगाव ते बोरी हा पाच किलोमीटर रस्ता वाहनधारकांसाठी जीवघेणा ठरत आहे. गेल्या महिनाभरात विविध प्रकारच्या वाहनांना या मार्गावर चार ठिकाणी अपघात झाले. यातूनच अनेकांना शारीरिक अपंगत्व आले आहे. परिसरात असलेल्या गावांमधील विद्यार्थ्यांना इतर ठिकाणी शिक्षणासाठी या मार्गाने जावे लागते. खड्ड्यांमुळे वाहनांचे नियंत्रण सुटून कधी अपघात होईल, याचा नेम राहिलेला नाही.
सदर मार्गावर जागोजागी एक ते दीड फूट खोल आणि दोन ते तीन फूट रूंद असे खड्डे तयार झालेले आहेत. या खड्ड्यांमध्ये अनेक ठिकाणी वाहने फसलेली आहेत. एक वाहन निघत नाही तोच दुसरे फसण्याचे प्रकार सुरू आहेत. या महामार्गाच्या निर्मितीपासूनच अनेक अडथळे निर्माण झाले आहेत. मध्येच काम सोडण्याचे प्रकार कंत्राटदारांनी केले. जे काम झाले त्याचाही दर्जा अतिशय सुमार राहिला. यातूनच समस्यांचा कळस निर्माण झाला.
या रस्त्याच्या दुर्दशेविषयी परिसरातील लोकप्रतिनिधींनी संबंधितांकडे केलेला पाठपुरावाही व्यर्थ ठरला आहे. साधी डागडुजीही करण्याचे सौजन्य दाखविले गेले नाही. प्रत्येक ३० ते ४० किलोमीटर अंतरात टोल नाके आहेत. वाहनधारकांकडून या टोल नाक्यांवर वसुली केली जाते. पण, वाहतूक सुरळीत व्हावी यासाठी काहीही उपाययोजना करण्यात आलेल्या नाहीत. गेली दोन दिवसांपासून विस्कळीत झालेली वाहतूक नियंत्रणाबाहेर गेली आहे. मार्ग मोकळा करण्यासाठी चक्क वडकी पोलिसांना दाखल व्हावे लागले. वडकीचे ठाणेदार अमोल माळवे आणि त्यांचे सहकारी याठिकाणी उपस्थित राहून वाहतूक सुरळीत करण्याचा प्रयत्न करत आहेत. सदर रस्त्याची दुरुस्ती न झाल्यास आंदोलनात्मक पाऊल उचलण्याचा इशारा देण्यात आला आहे. एकीकडे गतीमान प्रवासाचे स्वप्न दाखवित हा मार्ग अक्षरश: फसवणुकच करत आहे. (वार्ताहर)

Web Title: Accidental Session on National Highway

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.