गतिरोधकच देताहेत अपघातास आमंत्रण
By admin | Published: April 13, 2017 01:02 AM2017-04-13T01:02:04+5:302017-04-13T01:02:04+5:30
वाहनांचा वेग नियंत्रित राहावा आणि अपघाताचे प्रमाण टाळता यावे, यासाठी पुसद शहरात ठिकठिकाणी
आजार बळावले : पुसद शहरात अशास्त्रीय पद्धतीने बांधणी
अखिलेश अग्रवाल पुसद
वाहनांचा वेग नियंत्रित राहावा आणि अपघाताचे प्रमाण टाळता यावे, यासाठी पुसद शहरात ठिकठिकाणी उभारण्यात आलेले गतिरोधकच आता अपघातास आमंत्रण देत आहे. अशासकीय पद्धतीने बांधलेल्या गतिरोधकावरून वाहने उसळत असून यामुळे पाठीचे व मानेचे आजार जडत आहेत. बांधकाम विभाग मात्र या प्रकाराकडे दुर्लक्ष करीत असल्याने वाहनधारकांना मनस्ताप सहन करावा लागतो.
पुसद शहरातील मुख्य रस्त्यांसह अंतर्गत रस्त्यांवर गतिरोधक बांधण्यात आले आहे. गतिरोधक उभारताना नियमावलीचा वापर करणे गरजेचे असते. गतिरोधक कुठे असावा आणि कुठे असू नये, त्याची उंची किती असावी, स्लोप किती काढावा हे सर्व ठरलेले असते. परंतु शहरात असलेले गतिरोधक बघितले की, बहुतांश गतिरोधक अशास्त्रीय पद्धतीने बांधलेले दिसून येतात. काही ठिकाणी तर परिसरातील नागरिकांनी मागणी केली म्हणून कंत्राटदारानेच रस्त्यावर गतिरोधक उभारून टेकडे निर्माण केले आहे. शहरातील या गतिरोधकांचा आता वाहनधारकांना विट आला आहे.
विशेष म्हणजे, एकाही गतिरोधकाजवळ सावधानतेचा सूचना फलक नाही. गतिरोधकावर पांढऱ्या पट्ट्याही मारल्या नाही. पुसद नगरपरिषदेनेही या गतिरोधकाकडे दुर्लक्ष केले आहे. शहरात रस्त्यांच्या कंत्राटदारांनी स्थानिक लोकांच्या मागणीनुसार वाटेल तिथे गतिरोधक बनविले आहे. दोन गतिरोधकांमध्ये ठराविक अंतर असावे, याचे भानही कुणाला दिसत नाही. काही गतिरोधक ओबडधोबड आणि आकाराने मोठे आहे. चढावाच्या रस्त्यावर गतिरोधक असल्याने मालवाहू रिक्षाचालकांना मोठी कसरत करावी लागते. छोट्या व कमी उंचीच्या वाहनांचे यामुळे नुकसान होत आहे.
नवख्या वाहनचालकाला गतिरोधक माहीत नसतात. रात्रीच्या वेळी तर गतिरोधक दिसत नाही. त्यामुळे गतिरोधकाहून वाहन उसळून अपघाताचे प्रमाण वाढले आहे. वेग नियंत्रणासाठी असलेले गतिरोधक आज अपघातास कारणीभूत झाले आहे. पुसद शहरातील अतिक्रमण, बेशिस्त वाहतूक, पार्किंगचा अभाव आदी समस्यांकडे कुणीही लक्ष देत नाही. वारंवार गतिरोधकांवरून जावे लागत असल्याने अनेकांना पाठीचे व मानेचे आजार झाले आहे. शास्त्रीय पद्धतीने गतिरोधकाची उभारणी करावी आणि आवश्यकता नसेल तेथे गतिरोधक काढावे, अशी मागणी होत आहे. तसेच गतिरोधक असलेल्या ठिकाणी पांढरे पट्टे मारण्याची मागणीही नागरिक करीत आहे.