वैद्यकीय महाविद्यालयातही मुक्कामी कर्मचारी
By admin | Published: July 4, 2015 02:41 AM2015-07-04T02:41:59+5:302015-07-04T02:41:59+5:30
पोलीस दलातील मुक्कामी ठाणेदारांप्रमाणेच आता यवतमाळच्या वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात मुक्कामी कर्मचारी ...
अंतर्गत बदल्या : बदली टाळण्यासाठी राजकीय मोर्चेबांधणी
यवतमाळ : पोलीस दलातील मुक्कामी ठाणेदारांप्रमाणेच आता यवतमाळच्या वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात मुक्कामी कर्मचारी असल्याची बाब पुढे आली आहे. नियमानुसार या कर्मचाऱ्यांना अन्य महाविद्यालयांमध्ये बदलीवर पाठविणे बंधनकारक आहे. मात्र बदल्या होऊ नये म्हणून अनेक कर्मचारी राजकीय मार्गाने मोर्चेबांधणी करतात. शिवाय बदली दाखविण्यासाठी याच महाविद्यालयात अंतर्गत फेरबदल करून घेतात. एका तारांकीत प्रश्नाच्या निमित्ताने याबाबीचा उलगडा झाला आहे.
वैद्यकीय महाविद्यालयातील रॉयल्टी बेस टेबलवर अनेक वर्षापासून ठराविक कर्मचारी मुक्कामी आहेत. यामध्ये सर्जिकल स्टोअर, किरकोळ भंडार, लिनन या प्रमुख विभागासह इतर अनेक विभागांचा समावेश आहे. अशा रॉयल्टी बेस टेबलवर ठरविक कर्मचारी अनेक वर्षापासून आलटून पालटून काम करत आहेत. त्यांना एका विभाग प्रमुखाकडूनही पाठबळ मिळत आहे. प्रशासनातील प्रमुखाने सुध्दा अशा कर्मचाऱ्यांवर विशेष मर्जी दाखविली आहे. यापूर्वी सुध्दा संगनमताने विविध प्रकाराच्या साहित्य खरेदीत लाखोंचा भष्ट्राचार झाल्याची बाब उघडकीस आली होती. रुग्णालयात मुक्कामी असलेल्या कर्मचाऱ्यांसाठी बदली नियम लागू आहे की नाही, असाही प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे.
महाविद्यालय आणि रुग्णालय अशा दोन आस्थापना असून यातून त्यात अशीच बदली कागदोपत्री दाखविली जाते. मुळात या कर्मचाऱ्यांचे मुख्यालयच हलविण्याची गरज आहे. हिच बाब लोकमतने अधोरेखित केली होती. त्यावर तीन आमदारानी तारांकित प्रश्न उपस्थित केला आहे. यामुळे मुक्कामी कर्मचाऱ्यांचे धाबे दणाणले असून डीएमईआरमध्ये बसलेल्या गॉडफादरकडे त्यांनी धाव घेतली आहे. यातील काहींनी पुन्हा अंतर्गत बदलीचा लाभ घेण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहे. स्थानिक पुढाऱ्याचेही या कर्मचाऱ्यांना पाठबळ असल्याने त्यांनी आपले बस्तान बसविले होते. आता त्यांच्यावर डीएमईआरकडून कोणती कारवाई होते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
(कार्यालय प्रतिनिधी)