‘त्या’ ७१ कोटींचा हिशेब घेणे सुरू
By admin | Published: April 9, 2017 12:42 AM2017-04-09T00:42:35+5:302017-04-09T00:42:35+5:30
नोटाबंदीनंतर जिल्हा बँकेत जमा झालेल्या ७१ कोटींच्या जुन्या नोटांचा रिझर्व्ह बँकेला संशय आला होता.
शाखांची झडती : रिझर्व्ह बँकेचे दोन सदस्यीय पथक जिल्ह्यात धडकले
यवतमाळ : नोटाबंदीनंतर जिल्हा बँकेत जमा झालेल्या ७१ कोटींच्या जुन्या नोटांचा रिझर्व्ह बँकेला संशय आला होता. त्याची प्रथम तपासणी झाल्यानंतर आता दुसऱ्यांदा अशा खात्यांची तपासणी करण्यासाठी जिल्ह्यात रिझर्व्ह बँकेचे दोन सदस्यीय पथक दाखल झाले. हे पथक पुढील गुरूवारपर्यंत जिल्हा बँकेच्या काही शाखांची तपासणी करणरा आहे.
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या काही शाखांमध्ये नोटाबंदीनंतर तब्बल ७१ कोटींच्या जुन्या नोटा जमा करण्यात आल्या होत्या. यामध्ये संचालकांचाच पैसा असल्याचा संशय केंद्र आणि राज्य शासनाला आला. शेतकऱ्यांकडे एवढा पैसा असणे शक्यच नाही, असा शासनाचा कयास होता. त्यामुळे जिल्हा बँकेत जमा झालेले हे पैसे नेमके कुणाचे होते, हे तपासण्यासाठी या आधीच रिझर्व्ह बँकेची चमू यवतमाळात येऊन गेली होती. आता पुन्हा दुसऱ्यांदा दोन सदस्यीय पथक जिल्ह्यात दाखल झाले आहे.
रिझर्व्ह बँकेचे हे दोन सदस्य बँकेच्या विविध शाखांमध्ये पोहोचून नोटाबंदीनंतरच्या काळात जमा झालेल्या जुन्या नोटांचा आढावा घेत आहे. संबंधित खातेधारकांच्या कागदपत्रांची तपासणी केली जात आहे. खातेदाराकडे एवढे पैसे कुठून आले, याची माहिती घेतली जात आहे. या पथकाला खातेदाराने योग्य माहिती दिल्यास त्यांची सुटका होणार आहे. जे खातेदार जमा रकम कुठून आली, याबाबत समर्पक माहिती देऊ शकणार नाही, त्यांच्यावर कारवाई होण्याची शक्यता बळावली आहे. येत्या गुरूवारपर्यंत ही तपासणी मोहीम राबविली जाणार आहे. या पथकासोबत बँकेचे माहिती व तंत्रज्ञानात पारंगत असलेले अधिकारी, कर्मचारीही विविध शाखांची पाहणी करीत आहे. (शहर वार्ताहर)
रिझर्व्ह बँकेच्या पथकाला जिल्हा बँक पूर्णत: सहकार्य करीत आहे. पथक आल्यापासून त्यांनी जिल्ह्यातील शाखा तपासणीला सुरूवात केली.
- अविनाश सिंघम
मुख्य कार्यकारी अधिकारी
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक