जिल्हा परिषदेत खाते वाटप झाले, समितीसाठी मतदान
By admin | Published: November 8, 2014 01:44 AM2014-11-08T01:44:39+5:302014-11-08T01:44:39+5:30
जिल्हा परिषदेत विषय समित्यांचे खाते वाटप आणि समितीच्या रिक्त जागेवर सदस्यांची नियुक्ती यासाठी आज सर्वसाधारण सभा घेण्यात आली.
यवतमाळ : जिल्हा परिषदेत विषय समित्यांचे खाते वाटप आणि समितीच्या रिक्त जागेवर सदस्यांची नियुक्ती यासाठी आज सर्वसाधारण सभा घेण्यात आली. ही निवड प्रक्रिया पूर्ण करण्याअगोदर सभेत मागील इतिवृत्तावर चर्चा झाली. यामध्ये बीडीओंची सभेला असलेली गैरहजेरी हा मुद्दा सर्वच सदस्यांनी उचलून धरला. सत्ताधारी आणि विरोधकांनी सभेला बीडीओंना उपस्थित राहणे बंधनकारक करा, अशी एकमुखी मागणी केली.
इतिवृत्ताच्या चर्चेत बऱ्याच मुद्यांवरून विरोधकांप्रमाणेच सत्ताधारी सदस्यांनीही अधिकाऱ्यांना धारेवर धरले. नेहमी प्रमाणे वेळ मारून नेण्याचा प्रकार याही वेळेस पहायला मिळाला. समिती सदस्य निवडीची प्रक्रिया पूर्ण करण्याऐवजी सभेत इतिवृत्ताचीच चर्चा अधिक काळ चालत असल्याबाबत देवानंद पवार यांंनी आक्षेप घेतला. यावेळी शिवसेना व भाजपा सदस्यांनी त्यांच्या भूमिकेचे समर्थन केले तर काँग्रेस, राष्ट्रवादीच्या सदस्यांकडून याचे खंडण करण्यात आले. ही सभा ४ वाजेपर्यंत चालली. सभेदरम्यानच माजी अध्यक्ष प्रवीण देशमुख, उपाध्यक्ष बाळासाहेब मांगुळकर, सभापती नरेंद्र ठाकरे यांच्यात चर्चा सुरू होती. सभागृहाबाहेर येऊन या नेत्यांनी कोणते खाते कुणाला जाणार याबाबत वाटाघाटी केल्या. स्थायी समितीवर मिनाक्षी विलास राऊत यांनी आपला दावा केला. यावरून काँग्रेसच्याच दोन नेत्यात नाराजी नाट्यही रंगले. नंतर फोनवरून आलेल्या पक्षश्रेष्ठींच्या आदेशाची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी बाळासाहेब मांगुळकर यांच्यावर ठेऊन ठेपली. त्यांनी विलास राऊत यांची समजूत काढत ऐनवेळी राष्ट्रवादीला जागा सोडण्यास भाग पाडले. यानंतर लगेच खातेवाटप करण्यात आले. यामध्ये शिक्षण व आरोग्य हे महत्वपूर्ण खाते उपाध्यक्षांना देण्याऐवजी सभापती नरेंद्र ठाकरे यांच्याकडे सोपविण्यात आले. उपाध्यक्ष बाळासाहेब मांगुळकर यांच्याकडे कृषी व पशुसंवर्धन, सुभाष ठोकळ यांच्याकडे अर्थ व बांधकाम पूर्ववत कायम ठेवण्यात आले. (कार्यालय प्रतिनिधी)