माहूरच्या दुहेरी हत्याकांडातील सूत्रधाराला सासरी जाताना अटक
By admin | Published: November 2, 2014 10:40 PM2014-11-02T22:40:58+5:302014-11-02T22:40:58+5:30
येथील रामगड किल्ल्यातील दुहेरी हत्याकांडातील मुख्य सूत्रधार रघु डॉन उर्फ रघुनाथ नाना पळसकर याला पारवा (घाटंजी) परिसरातून अटक करण्यात आली. तो सासरी जात असतानाच
माहूर : येथील रामगड किल्ल्यातील दुहेरी हत्याकांडातील मुख्य सूत्रधार रघु डॉन उर्फ रघुनाथ नाना पळसकर याला पारवा (घाटंजी) परिसरातून अटक करण्यात आली. तो सासरी जात असतानाच पोलिसांच्या जाळ्यात अडकला. पारवा पोलिसांच्या मदतीने माहूर पोलिसांनी ही कारवाई पार पाडली.
अभियांत्रिकीची विद्यार्थिनी निलोफर खालीद बेग रा. पुसद आणि शाहरुख फिरोज खान पठाण रा. उमरखेड यांचे छिन्नविच्छन मृतदेह १० आॅक्टोबर रोजी येथील रामगड किल्ल्यावर आढळून आले होते. या दोघांचे मारेकरी कोण याचे गूढ कायम होते. दरम्यान नांदेड स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने या प्रकरणी पाच जणांना अटक केली. त्यांनी दिलेल्या माहितीच्या आधारे प्रकरणाचा उलगडा झाला. मात्र मुख्य सूत्रधार रघु हा पसार होता. तो पारवा नजीकच्या एका गावात सासरवाडीला पायदळ जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. माहूरचे पोलीस निरीक्षक डॉ. अरुण जगताप, सहायक फौजदार जगदीश गिरी, जमादार गेडाम, गावंडे, शारदासूत खामणकर, पेंदोर, गोपनीय शाखेचे बंडू जाधव यांनी उपविभागीय पोलीस अधिकारी दत्तात्रय कांबळे यांच्या मार्गदर्शनात तत्काळ पारवा परिसर गाठला.
पारव्याचे ठाणेदार तावडे यांच्या मदतीने सापळा रचून रघुला ताब्यात घेण्यात आले. दरम्यान ३० व ३१ आॅक्टोबर रोजी पुसद आणि माहूर येथून ताब्यात घेण्यात आलेल्या दोन प्रतिष्ठीतांविषयी विचारले असता चौकशी सुरू आहे, एवढेच उत्तर देण्यात आले.
या प्रकरणात आतापर्यंत अटकसत्रच सुरू असले तरी या दोघांची हत्या कुणी आणि कशासाठी केली, या प्रश्नाचा उलगडा झाला नाही. सध्या रघु माहूर पोलिसांच्या ताब्यात आहे. या गुन्ह्याचा तपास नांदेड स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाकडे असल्याने त्याला या शाखेकडे सोपविले जाणार आहे. (वार्ताहर)