११ कोटींच्या भूखंड घोटाळ्यात आरोपींचा जामीन फेटाळला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2020 05:00 IST2020-09-13T05:00:00+5:302020-09-13T05:00:18+5:30
देशाच्या घटना समितीचे सदस्य, मध्यप्रदेश विधानसभेचे सदस्य आणि राज्यसभा सदस्य राहिलेल्या दिवंगत काजी सय्यद करीमुद्दीन यांची येथील श्रोत्री हॉस्पिटल चौकात स्थावर मालमत्ता आहे. या मालमत्तेची किंमत पोलिसांच्या अंदाजानुसार ११ कोटी तर बाजार भावाने त्यापेक्षा किती तरी अधिक आहे. परंतु ही संपत्ती बनावट कागदपत्रांचा आधार घेऊन परस्पर विकली गेली.

११ कोटींच्या भूखंड घोटाळ्यात आरोपींचा जामीन फेटाळला
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : स्थानिक श्रोत्री हॉस्पिटल चौकातील दिवंगत काजी यांची ११ कोटींची मालमत्ता बनावट कागदपत्रांच्या आधारे अवघ्या दीड कोटीत विकली गेली. या प्रकरणात अवधूतवाडी पोलिसांनी अटक केलेल्या पाच आरोपींना आधी सत्र न्यायालयाने अटकपूर्व आणि आता प्रथम श्रेणी न्यायालयाने नियमित जामीन नाकारला. शिवाय पोलिसांच्या तपासावर ताशेरेही ओढले.
देशाच्या घटना समितीचे सदस्य, मध्यप्रदेश विधानसभेचे सदस्य आणि राज्यसभा सदस्य राहिलेल्या दिवंगत काजी सय्यद करीमुद्दीन यांची येथील श्रोत्री हॉस्पिटल चौकात स्थावर मालमत्ता आहे. या मालमत्तेची किंमत पोलिसांच्या अंदाजानुसार ११ कोटी तर बाजार भावाने त्यापेक्षा किती तरी अधिक आहे. परंतु ही संपत्ती बनावट कागदपत्रांचा आधार घेऊन परस्पर विकली गेली. काजी यांचे वारसदार मोईन काजी रा. आकारनगर काटोल रोड, नागपूर यांनी या संपत्तीचे मुखत्यार म्हणून सै.हबीबूल हसन काद्री यांना नियुक्त केले आहे.
ही संपत्ती परस्पर विकली गेल्याचे कळताच हबीबूल हसन यांच्या तक्रारीवरून अवधूतवाडी पोलीस ठाण्यात १८ जुलै २०२० रोजी भादंवि ४२०, ४६५, ४६७, ४७१, १२० (ब) व ३४ कलमान्वये गुन्हा नोंदविला गेला. या प्रकरणी मनोज पांडुरंग पाटील रा. काठोडा ता. आर्णी, सखाराम जनार्दन देवघरे रा. शंकर टॉकीजसमोर दिग्रस, इफ्तेखार खान गुलाब खान रा. संभाजीनगर दिग्रस, आलमगीर जहागीर खान पठाण रा. संभाजीनगर दिग्रस, हिंमत नामदेवराव नागमोडे रा. सेलू ता. आर्णी यांना अटक करण्यात आली. या आरोपींचा २७ ऑगस्टला जिल्हा व सत्र न्यायाधीश टी.एस. अकाली यांनी अटकपूर्व जामीन नाकारला. तर ९ सप्टेंबर रोजी प्रथम श्रेणी न्याय दंडाधिकारी एस.एच. अटकरे यांनी जामीन नाकारला.
११ कोटींच्या या भूखंड खरेदी प्रकरणात स्थानिक भूमाफिया यात सहभागी आहेत, त्यांना राजकीय अभय असल्याने त्यांना रेकॉर्डवर घेण्याचे आव्हान पोलिसांपुढे आहे. पोलिसांचे हात या माफियांपर्यंत पोहोचतात का याकडे सर्वांच्या नजरा आहेत.
न्यायाधीश म्हणाले, प्रकरण गंभीर, जन्मठेप होऊ शकते
पाचही आरोपींच्या अटकपूर्व जामिनावर निर्णय देताना अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश टी.एस. अकील म्हणाले, हे प्रकरण गंभीर आहे. यातील कलम ४६७ नुसार जन्मठेपेची शिक्षा होऊ शकते. तपास यंत्रणेला आणखी बऱ्याच गोष्टी उघड करायच्या आहेत.
आरोपींच्या नियमित जामीन अर्जावर सुनावणी करताना प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी एस.एच. अटकरे म्हणाले, आरोपींनी बनावट मृत्यूपत्र तयार करून या आधारे भूमिअभिलेख कार्यालयात भूखंडासंदर्भात खोटी आखीव पत्रिका तयार केल्याची तक्रार आहे. त्यात संबंधित शासकीय कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांचाही सहभाग असल्याचे प्रथमदर्शनी दिसते. त्या दृष्टीनेही पोलिसांचा तपास पूर्ण झालेला नाही. त्यामुळे तपास अधिकाºयांची भूमिका संशयास्पद आहे. प्रकरण गंभीर असून यात बनावट आखीव पत्रिका तयार करण्यात आणखी कोण कोण समाविष्ट आहे, याचा शोध घ्यावा असे निर्देश न्यायालयाने दिले.