आजी-माजींची प्रतिष्ठा पणाला

By admin | Published: May 25, 2016 12:20 AM2016-05-25T00:20:43+5:302016-05-25T00:20:43+5:30

येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत आजी आणि माजी आमदारांची प्रतिष्ठा पणास लागली आहे.

Achieve the reputation of grandmothers and grandfathers | आजी-माजींची प्रतिष्ठा पणाला

आजी-माजींची प्रतिष्ठा पणाला

Next

नवीन समीकरणे : युती, आघाडीत पडली फूट, बुधवारी होणार चिन्ह वाटप
वणी : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत आजी आणि माजी आमदारांची प्रतिष्ठा पणास लागली आहे. विद्यमान आमदारांसह दोन माजी आमदारांना या निवडणुकीत आपले कसब पणाला लावून विजय खेचून आणावा लागेल. त्यासाठी नवीनच राजकीय समीकरण उदयास आले आहे.
राज्य आणि देशात भाजपा-शिवसेना युतीची सत्ता आहे. मात्र स्थानिक पातळीवर युतीतील पदाधिकारी आणि कार्यकर्ते भरकटले आहे. वणी विधानसभा क्षेत्रात गेल्या काही निवडणुकीपासून युतीत कुरबूर आहे. त्यामुळे ‘इंदिरा’च्या निवडणुकीनंतर या मित्र असलेल्या पक्षांतील दुरावा चांगलाच वाढला आहे. ‘इंदिरा’च्या अध्यक्षपदाने ऐनवेळी आमदारांना हुलकावणी दिल्याने सध्या या दोन पक्षांमधून विस्तवही आडवा जात नसल्याची चर्चा आहे. परिणामी वणीत ‘युती’त फूट पडल्याचे दिसत आहे.
अशीच गत काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या आघाडीची आहे. राज्यात सतत १५ वर्षे सत्तेत असलेले आघाडीचे कार्यकर्ते आता परस्परविरोधी भूमिका घेत निवडणूक लढवीत आहे. वणी विधानसभेत काही ठिकाणी या दोन पक्षांनी कधी एकत्र, तर कधी विरोधात निवडणूक लढविली. बाजार समितीच्या निवडणुकीतही आघाडीतील हे दोन पक्ष परस्परांच्या विरोधात लढत आहे. केंद्र आणि राज्यातील सत्ता गमावल्याने आघाडीतील पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते मिळेल त्या निवडणुकीत यश खेचून आणण्यासाठी प्रयत्नशील झाले आहे. त्यामुळेच येथील बाजार समितीच्या निवडणुकीत यावेळीच नवीनच राजकीय समीकरणे उदयास आली आहे.
बाजार समितीत आत्तापर्यंत काँग्रेसच्या अ‍ॅड.विनायक एकरे यांच्या गटाला सहकार्य करणारी शिवसेना यावेळी माजी आमदार वामनराव कासावार यांच्या काँग्रेससोबत आहे. त्याचप्रमाणे आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस भाजपाच्या मदतीला धावून गेली असून ते अ‍ॅड.एकरे यांच्या सहकार्याने बाजार समितीवर वर्चस्व प्राप्त करण्यासाठी लढणार आहे. त्यामुळे भाजपाचे आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार आणि माजी आमदार तथा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष वामनराव कासावार व माजी आमदार तथा शिवसेना जिल्हा प्रमुख विश्वास नांदेकर यांच्यासाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची ठरणारी आहे.
एकीकडे विद्यमान आमदार, तर विरोधात दोन माजी आमदारांमधील हा सामना चांगलाच रंगणार आहे. विद्यमान आमदारांच्या साथीला राष्ट्रवादीचे संजय देरकर आणि अ‍ॅड.विनायक एकरे आहे. दोन माजी आमदारांच्या मदतीलाही अ‍ॅड.देविदास काळे आहे. दोन्ही बाजूंनी दोन वकिलांनी या लढतीत चांगलीच चुरस निर्माण केली आहे. या वकिलांच्या नेतृत्वातच ही निवडणूक लढली जाणार असल्याचे संकेत आहे. (कार्यालय प्रतिनिधी)

Web Title: Achieve the reputation of grandmothers and grandfathers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.