पुरस्कारप्राप्त ग्रामसेविका एसीबीच्या जाळ्यात

By admin | Published: June 4, 2016 02:08 AM2016-06-04T02:08:00+5:302016-06-04T02:08:00+5:30

जिल्हा परिषदेने महिनाभरापूर्वी आदर्श म्हणून गौरविलेल्या नाकापार्डी येथील ग्रामसेविकेला आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील ...

Achieved the gramsevika of ACB | पुरस्कारप्राप्त ग्रामसेविका एसीबीच्या जाळ्यात

पुरस्कारप्राप्त ग्रामसेविका एसीबीच्या जाळ्यात

Next

तीन हजारांची लाच : आत्महत्याग्रस्त कुटुंबाकडेच पैशाची मागणी
यवतमाळ : जिल्हा परिषदेने महिनाभरापूर्वी आदर्श म्हणून गौरविलेल्या नाकापार्डी येथील ग्रामसेविकेला आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील सदस्याकडून तीन हजार रुपयांची लाच घेतल्याप्रकरणी शुक्रवारी यवतमाळातून ताब्यात घेण्यात आले.
सविता अनंतराव बोरखडे (४०) असे लाचलुचपत प्रतिबंधक खात्याच्या जाळ्यात अडकलेल्या ग्रामसेविकेचे नाव आहे. बोरखडे ही यवतमाळ तालुक्यातील नाकापार्डी ग्रामपंचायतीत कार्यरत आहे. नाकापार्डी येथील शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबातील सदस्याला शासनाकडून विहीर मंजूर झाली. या विहिरीसाठी ८५ हजार ४४८ रुपयांचा धनादेश तयार होता. परंतु ग्रामसेविका सविता बोरखडे यांनी या धनादेशासाठी तीन हजार रुपयाची मागणी केली. त्यावरून संबंधित शेतकऱ्याने यवतमाळच्या लाचलुचपत प्रतिबंधक खात्याकडे तक्रार केली. या तक्रारीवरून चौकशी केली असता त्यांनी तीन हजार रुपये घेतल्याचे पुढे आले. एसीबीचे पथक शुक्रवारी नाकापार्डीत धडकले. परंतु ग्रामसेविका तेथे उपस्थित नव्हत्या. त्यामुळे यवतमाळातील वडगाव रोड परिसरातील त्यांच्या घरुन ताब्यात घेण्यात आले. या घटनेने प्रशासनातील कर्मचारी शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबाबाबत किती संवेदनशील आहे हे दिसून आले. बळीराजा चेतना अभियानातून शेतकऱ्यांना बळ देण्याचा कांगावा प्रशासन करीत असताना त्याच प्रशासनातील पुरस्कार प्राप्त ग्रामसेविका मात्र आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाला पैशाची मागणी करतात, हे पुढे आले.
ही कारवाई पोलीस निरीक्षक नितीन लेव्हरकर, अस्मिता नगराळे, कर्मचारी अमोल महल्ले, शैलेश ढोणे, नीलेश पखाले, अरुण गिरी, नरेंद्र इंगोले, अनिल राजकुमार, सुधाकर मेश्राम, भारत चिरडे, विशाल धलवार यांनी केली. या कारवाईने प्रशासकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. (कार्यालय प्रतिनिधी)

Web Title: Achieved the gramsevika of ACB

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.