शेतकऱ्यांची लूट करणाऱ्या कृषी केंद्रांवर कारवाई
By admin | Published: July 17, 2014 12:22 AM2014-07-17T00:22:36+5:302014-07-17T00:22:36+5:30
तालुक्यातील काही कृषी केंद्रांमध्ये शेतकऱ्यांची प्रचंड लूट होत असून बोगस बियाणे माथी मारले जात आहे. याप्रकरणी झालेल्या तक्रारीवरून कृषी विभागाने कृषी केंद्र तपासणी मोहीम सुरू केली
उमरखेड (कुपटी) : तालुक्यातील काही कृषी केंद्रांमध्ये शेतकऱ्यांची प्रचंड लूट होत असून बोगस बियाणे माथी मारले जात आहे. याप्रकरणी झालेल्या तक्रारीवरून कृषी विभागाने कृषी केंद्र तपासणी मोहीम सुरू केली असून दोषी आढळलेल्या चार कृषी केंद्राचे परवाने निलंबित करण्यात आले. तर आठ जणांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली. यामुळे तालुक्यातील कृषी केंद्र चालकांमध्ये प्रचंड खळबळ उडाली आहे.
उमरखेड तालुक्यात ५६ कृषी केंद्र आहेत. त्यात उमरखेड, विडूळ, साखरा, खरूस, देवसरी, चातारी, ब्राह्मणगाव, ढाणकी, बिटरगाव, जेवली, दराटी, निंगणूर, भवानी, कुपटी, पोेफाळी, मुळावा या गावांचा समावेश आहे. याठिकाणी बी-बियाणे, खते आणि किटकनाशकांची विक्री केली जाते. सध्या पेरणीचे दिवस असून पावसाला प्रारंभ झाल्याने शेतकरी कृषी केंद्रात गर्दी करून आहेत. मात्र याच परिस्थितीचा फायदा घेत काही कृषी केंद्रांमध्ये शेतकऱ्याची लूट केली जात आहे. बियाण्याच्या पाकिटवर छापील किमतीपेक्षा अधिक किमतीत बियाणे विकल्या जाते. अनेकदा लिंकींग करून अनावश्यक खते आणि बियाणे शेतकऱ्यांच्या माथी मारल्या जातात. एवढेच नाही तर आंध्रप्रदेशातील बोगस कंपन्यांचे बियाणेही शेतकऱ्यांना विकले जात आहे. याबाबत कृषी विभागाकडे अनेक तक्रारी झाल्या.
उमरखेड कृषी विभागाला प्राप्त तक्रारीची दखल घेण्यात आली. कृषी केंद्राची तपासणी करण्यासाठी एक पथक तयार करण्यात आले. या पथकाने तालुक्यातील सर्वच्या सर्व ५६ कृषी केंद्रांची तपासणी केली. त्यावेळी नुतनीकरण नसलेले काही कृषी केंद्र आढळून आले. मे-जून महिन्यात कृषी केंद्रातील बियाण्याची ुउगवण शक्ती पाहण्यासाठी नागपूर येथील शासकीय बिज विश्लेषण प्रयोगशाळेत नमुने पाठविण्यात आले होते. त्या तपासणीदरम्यान सोयाबीनची उगवण शक्ती कमी आढळून आली. त्यामुळे १९६६ च्या सेक्शन १९ नुसार तालुक्यातील ८ कृषी केंद्रांना नोटीस बजावण्यात आली आहे. त्यात शरद कृषी केंद्र उमरखेड, शेतकी भंडार उमरखेड, भावेश्वर कृषी केंद्र ढाणकी, प्रभूदेव कृषी केंद्र ढाणकी, प्रगती कृषी केंद्र उमरखेड, वर्धमान कृषी केंद्र उमरखेड, एकवीरा कृषी केंद्र मुळावा, नटराज कृषी केंद्र ढाणकी यांचा समावेश आहे. या सर्वांना मंगळवार १५ जुलै रोजी नोटीस बजावण्यात आली आहे. (वार्ताहर)